संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पुलवामा हल्ल्याचा निषेध

संयुक्त राष्ट्रे : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्याचा आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही निषेध केला गेला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनेही हा हल्ला अक्षम्य आणि भ्याड असल्याचे सांगत या हल्ल्याचा निषेध केला आहे. सुरक्षा परिषदेने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा उल्लेख करत अशा निंदनीय हल्ल्यातील दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षा सुरक्षा परिषदेने व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने पारित केलेला हा ठराव हा पाकिस्तानला धक्का असल्याचे मानले जात आहे.

सुरक्षा परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावात दहशतवादी मसूद अजहर याच्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा उल्लेख केला आहे. मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या मागणीबाबत चीनने याआधी नकाराधिकाराचा वापर केलेला होता. हे पहाता चीनचा समावेश असलेल्या सुरक्षा परिषदेतील या ठरावाचे महत्व वाढले आहे. पुलवामा हल्ल्याला कारणीभूत ठरलेल्यांविरोधात कारवाईसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला सहकार्य करावे असे आवाहनही सुरक्षा परिषदेने या प्रस्तावाच्या माध्यमातून केले आहे.

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार याने लाटूमोड येथे ताफ्यावर ३५० किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.