Pune : अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची उडाली तारांबळ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुण्यात आज (सोमवार) दुपारी चार पासून शहरातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. उद्या सण असल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची अचानक आलेल्या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. शहरात आकाशात काळे ढग दाटून आले होते. त्यामुळे दुपारी काळोख पसरला होता. दोन दिवसांच्या विकेंडच्या लॉकडाऊनमुळे घरात असलेले पुणेकर आज दुपारी घराबाहेर पडताच, पावसाने गाठले. दिवभर तापमानात वाढ झाली असताना दुपारी पडलेल्या पावसामुळे पुणेकरांना सुखद धक्का दिला.

पुण्यात आज दुपारी ढगांच्या गडगडाटासह अचानक पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे बेसावध असलेल्या पुणेकरांची चांगलीच धांदल उडाली होती. आज दिवसभर उन्हाची काहिली मुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांना दुपारी अचानक आलेल्या पावसाने भिजवून सोडले. तर काही जणांनी पावसाचा अंदाज असल्याने छत्र्या घेऊनच बाहेर पडले होते. त्यामुळे ते पावसाच्या तावडीत सापडले नाहीत.अचानक आलेल्या पावसामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची देखील तारांबळ उडाली. अचानक आलेल्या जोरदार पावसाने दुचाकी वाहन चालकांची देखील मोठी तारांबळ उडाल्याचे पहायला मिळाले. जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते.

पुणे शहरात सोमवारी (दि.12) दुपारनंतर आकाशात समान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर मंगळवार व बुधवारी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला होता. गेल्या आठवड्यात 39 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेला कमाल तापमानाचा पारा 37 अंश सेल्लिअसपर्यंत कमी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काहीही असलंत तरी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे चांगलेच सुखावले आहे.