लस हे अमृत नाही, जोपर्यंत लस मिळत नाही तोपर्यंत मीच माझा रक्षक या भूमिकेतून स्वयंशिस्त पाळा : राजेश टाेपे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   लस हे अमृत नाही, जोपर्यंत लस मिळत नाही तोपर्यंत मीच माझा रक्षक या भूमिकेतून प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. महाराष्ट्रातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि संपादक-पत्रकार या कोरोना योद्ध्यांचा शुक्रवारी (दि.४) आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते पुण्यात सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

टोपे म्हणाले, राज्यातील कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९३ टक्क्यांवर गेले असून, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ६०० दिवसांवर गेला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्याचे खरे श्रेय डॉक्टरांना जाते. मानवतेचे रक्षण करण्याचे काम डॉक्टरांनी केले. डॉक्टरांमध्ये देवाचे दर्शन झाले. या देवदूतांचा सन्मान महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने केला, हा उपक्रम स्तुत्य असून प्रत्येकास प्रेरणा देणारा आहे. कोरोनादरम्यान अनेक हात पुढे सरसावले. सेवा देण्याचे हे काम मानवतेच्या दृष्टीने झाले आहे.

कोरोना संसर्गाच्या काळात काम करत असणाऱ्या पत्रकारांना विमा कवच देण्यासाठी मी आग्रही असून, पत्रकारांसाठी सरकार दरबारात मी कायम वकिलाची भूमिका पार पाडेल, अशी ग्वाहीसुद्धा टोपे यांनी दिली.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं, राज्याच्या कानाकोपऱ्यातून कोरोना संकटादरम्यान अनेकांनी लढा दिला. या कोरोना योद्ध्यांना शोधून काढून त्यांचा सत्कार करणे ही अभिमानास्पद बाब आहे. पत्रकारांनीदेखील सकारात्मक बातम्या देऊन डॉक्टर, कर्मचारी त्याचसोबत या काळात मोलाचे योगदान देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे मनोधैर्य वाढवण्यास मदत केली.

त्यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, महाएनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, लोहिया परिवार ट्रस्टचे अध्यक्ष पुरुषोत्तम लोहिया, प्रदेश कार्याध्यक्ष किरण जोशी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पुणे अध्यक्ष नितीन बिबवे व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच कोरोनाने दुर्दैवी निधन झालेल्या पत्रकारांच्या मुलांचे पालकत्व यावेळी स्वीकारण्यात आले.