उत्तर प्रदेश विधानसभेची तयारी, मोदींच्या उपस्थितीत झाली ‘भाजप-आरएसएस’ची महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हाहाकार माजवला असून ही लाट नियंत्रणात आणण्याचे केंद्र सरकारसमोर मोठं आव्हान आहे. याच दरम्यान उत्तर प्रदेशात नदीत आढळून आलेल्या मृतदेहामुळे केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली आहे. विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर रणनिती ठरवण्यासाठी रविवारी (दि.23) भाजप आणि आरएसएस यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला स्वत: नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह आरएसएसचे नेते उपस्थित होते. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे.

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी निवडणुका होत आहे. परंतु कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यावरुन योगी सरकारवर टीका होत आहे. योगी सरकारवर विरोधक टीका करत असताना योगींना पक्षातील खासदार आमदारांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपची पिछेहाट झाली आहे. त्यामुळे भाजपने सरकारची प्रतिमा चांगली करण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती ठरवण्याचं काम सुरु केलं आहे.

याच पार्श्वभूमीवर रविवारी भाजप आणि आरएसएसची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष सुनील बन्सल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. उत्तर प्रदेशात 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसंदर्भात याबैठकीत चर्चा झाली. तसेच सध्या निर्माण झालेल्या कोरोना परिस्थितीचा निवडणुकीवर होणारा परिणाम आणि त्यावर कशा प्रकारे मात करायची आणि पक्षाला पुन्हा नंबर वन ठेवण्यासाठी आखायच्या रणनीतीवर चर्चा झाली.

उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत भाजपला झटका बसला आहे. योगी आदित्याना यांच्या गोरखपूरमध्ये समाजवादी पक्षाने मुसंडी मारत जोरदार टक्कर दिली. तर मथुरा आणि इतर पंचायत समितीचे निकाल देखील भाजपला चिंतन करायला लावणारे आहेत. या निकालातून धडा घेत आणि सध्या कोरोना हातळण्यावरुन होत असलेली टीका यावर या बैठकीत चर्चा झाली.