500 वर्षांची प्रतीक्षा संपली, PM मोदींमुळे हा क्षण सत्यात उतरला : योगी अदित्यनाथ

अयोध्या : वृत्तसंस्था – राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने 500 वर्षाची प्रतीक्षा संपली असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी म्हटले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. संपूर्ण देशाचे लक्ष या सोहळ्याकडे लागून राहिले होते. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी उपस्थितांना संबोधित करताना 500 वर्षापूर्वीच्या स्वप्नाची पूर्तता होत असल्याची भावना व्यक्त केली. योगी आदित्यनाथ म्हणाले, या क्षणामागे 500 वर्षांचा संघर्ष, साधना आहे.

भारताची लोकतांत्रिक मृल्य, कायदेशीर प्रक्रिया, संविधानाची संमती या सगळ्या प्रक्रियेतून जात आजचा हा दिवस दिसत आहे. या क्षणाची वाट पहात अनेक पिढ्या गेल्या. अनेक महापुरुषांनी बलिदान केलं. आपल्या डोळ्यासमोर राम मंदिर उभं रहावं अशी अनेकांची इच्छा होती. नरेंद्र मोदींनी कायदेशीर तसंच शांततेच्या मार्गाने या समस्येचं निराकरण कसं केलं जातं हे दाखवून दिलं आहे.

नरेंद्र मोदी यांच्यामुळे हा क्षण सत्यात उतरला असल्याचे, योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. यावेळी योगी आदित्यानाथ यांनी सरसंघचालक मोहन भागवत आणि सर्व अनुउपस्थित संतांचेही अभिनंदन केले. अयोध्येला सर्वात समृद्ध बनवण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. आम्हा सर्वांसाठी हा अत्यंत भावनात्मक दिवस असल्याचे योगी यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदिबेन पटेल, नृत्यगोपालदास महाराज, चंपतरायजी आदी उपस्थित होते.