आग्र्यातील संग्रहालयाला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव, CM योगी यांचा कौतुकास्पद निर्णय
पोलिसनामा ऑनलाईन टीम – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा येथे बांधण्यात येणार्या संग्रहालयाला मुघलांचे नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिल्याची घोषणा केली आहे. गुलामीची मानसिकता असलेल्या प्रतीक चिन्हांना नव्या उत्तर प्रदेशात स्थान नाही. आपल्या सगळ्यांचे नायक छत्रपती शिवाजी महाराज आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.
आग्रा येथे बांधण्यात येणारे हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी अधिकृत ट्विट अकाऊंटवर ही माहिती दिली आहे. ताजमहालच्या पूर्वेकडे असलेल्या द्वाराजवळ हे संग्रहालय बांधण्यात येत आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे सरकार होते तेव्हाच या संग्रहालयाचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. त्यानंतर या संग्रहालयाचे नाव बदलण्याची चर्चा सुरु होती. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले आहे.
गुलामीच्या मानसिकतेचे प्रतीक चिन्हे सोडून देशाचा गौरव वाढवणार्या विषयांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आपले नायक छत्रपती शिवाजी महाराज आहेत असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.