अयोध्येत मशीद आवारातील भूमिपूजनाचे योगी आदित्यनाथांना ‘निमंत्रण’

पोलिसनामा ऑनलाईन – अयोध्येत मशिदीसाठी देण्यात आलेल्या जागेवर सार्वजनिक सुविधांच्या भूमिपूजनासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण देण्यात येईल, असे सुन्नी केंद्रीय वक्फ मंडळाने म्हटले आहे. त्यामुळे आता योगी आदित्यनाथ उद्घाटनाला जाणार की नाही असा सवाल उपस्थित होत आहे.

‘आपण योगी व हिंदू असल्याने मशिदीच्या पायाभरणी समारंभास जाणार नाही’, असे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. अयोध्येतील धन्नीपूर खेडयात ही मशीद बांधण्यात येणार आहे. धन्नीपूर येथे पाच एकर जागा मशिदीसाठी देण्याचे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील आदेशानुसार जाहीर केले आहे. या मशिदीच्या आवारात रुग्णालय, वाचनालय, सामुदायिक स्वयंपाकगृह व संशोधन केंद्र उभारण्यात येणार असून या सगळ्या सुविधा लोकांसाठी असल्याने त्या प्रकल्पांच्या पायाभरणी कार्यक्रमाकरिता योगी आदित्यनाथ यांना निमंत्रित केले जाईल असे इंडो-इस्लाम सांस्कृतिक महासंघाचे सचिव व मशिदीसाठीच्या विश्वस्त संस्थेचे प्रवक्ते अथर हुसेन यांनी सांगितले.