कोरोना संकटात 16 सरकारी डॉक्टरांचा सामूहिक राजीनामा; प्रशासनामध्ये प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोनाचे मोठे संकट असताना उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये 16 सरकारी डॉक्टरांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. राजीनामा देणारे विविध डॉक्टर सामुदायिक आरोग्य केंद्र (CHC) आणि प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) चे प्रभारी आहेत. राजीनामा देताना त्यांनी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांवर आरोप केला आहे.

प्रशासनातील हुकूमशाही पद्धत आणि विभागीय उच्च अधिकाऱ्यांचा असहकार्य या कारणामुळे उन्नावच्या 16 प्राथमिक आणि सामुदायिक आरोग्य केंद्र प्रभारी यांनी पदाचा सामूहिक राजीनामा दिला आहे. सीएमओ डॉ. आशुतोष यांची भेट न झाल्याने त्यांनी डेप्युटी सीएमओ डॉ. तन्मय कक्कड यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनामा देणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले, की ‘कोरोना काळात आम्ही निष्ठापूर्वक कर्तव्य बजावत आहे. तरीही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दंडात्मक आदेश जारी करून हुकूमशाही पद्धत सुरु केली आहे. इतकेच नाहीतर विभागीय उच्चाधिकाऱ्यांनीही सहकार्य न करण्याची भूमिका घेतली आहे’.

पीएचसी गंजमुरादाबादचे प्रभारी डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले, की ‘ज्याप्रकारे ते आमच्याशी वागतात त्यामुळे आम्हाला त्रास होतो. RT-PCR टेस्ट असो किंवा कोविड व्हॅक्सिनेशन किंवा इतर कोणताही कार्यक्रम आम्हाला लगेच टार्गेट केलं जातंय. आमच्याशी योग्य वर्तन केले जात नाही’.