धक्कादायक ! 15 दिवस ‘कोरोना’ रुग्ण जिवंत असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं, सत्य समोर आल्यानंतर कुटुंब हादरले

लखनऊ : वृत्तसंस्था – देशात कोरोनाच्य दुसऱ्या लाटेनं थैमान घातले आहे. दिवसेंदिवस वेगाने रुग्ण वाढत असताना मृतांचा आकडा देखील वाढत आहे. कोरोना काळात अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. कोरोना बाधित रुग्णाचा मृतदेह नातवाईकांना दिला जात नाही. त्यांच्यावर नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले जातात. काहीवेळा मृतदेहांची आदलाबदल झाल्याचे प्रकार समोर आले आहे. मात्र, उत्तर प्रदेशात एक धक्कादायक प्रकार समोर आला. रुग्णाची मुलगी रुग्णालयात गेल्यानंतर हा प्रकार समोर आल्यानंतर कुटुंबाला मोठ्ठा धक्का बसला. त्यामुळे रुग्णालयाचा भोंगळ कारभार उजेडात आला.

उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने त्याला कोविड वार्डात भरती करण्यात आले होते. या ठिकाणचे डॉक्टर रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्ण बरा असल्याची माहिती देत होते. ज्यावेळी रुग्णाची मुलगी हॉस्पिटलमध्ये पोहोचली त्यावेळी जे समजले ते ऐकून तिला आणि तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. रुग्णाचा पंधरा दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. आणि डॉक्टर नातेवाईकांना रुग्ण बरा असल्याचे सांगत होते. हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील एलएलआरएम मेडिकल कॉलेजमध्ये घडला.

या प्रकरणाचा खुलासा गुरुवारी झाला. रुग्णाचा 23 एप्रिल रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. असा दावा मेडिकल प्रशासनाने केला आहे, की त्याच काळात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांनी आपली चूक मान्य करत चौकशी समितीची स्थापना केली . सुरुवातीच्या चौकशीमध्ये संतोष कुमार या रुग्णाचा 23 एप्रिल रोजी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

संतोष कुमार यांना 21 एप्रिल रोजी सकाळी त्रास होऊ लागल्याने मेरठ येथील कोविड वार्डात उपचारासाठी भरती करण्यात आले. मुलगी शिखा शिवांगी हिने दिलेल्या माहितीनुसार, ती दररोज कंट्रोल रुममध्ये फोन करुन वडीलांच्या प्रकृतीची चौकशी करत होती. त्यावेळी तिला उपचार सुरु असून रुग्ण बरा असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र तीन मे नंतर तिला कोणतीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे तिने मेरठ रुग्णालय गाठले. त्यावेळी कोविड वार्डात संतोषची काहीही माहिती मिळाली नाही. मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांनी सांगितले की, संतोष यांचा मृत्यू झाला असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, संतोष कुमार यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याचवेळी आणखी एका संतोष कुमार नावाच्या व्यक्तीला उपचारासाठी दाखल करण्यात आले. संतोष कुमार यांचा 23 एप्रिल रोजी मृत्यू झाला. एकाच नावाचे दोन रुग्ण असल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा गोंधळ झाला. ज्या संतोष कुमारची प्रकृती बरी आहे त्याची माहिती मृत संतोष कुमार यांच्या नातेवाईकांना दिली जात होती. चौकशी समितीचा अहवाल येताच संबंधितांवर योग्य कारवाई केली जाईल, अशी माहिती मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. ज्ञानेंद्र कुमार यांनी दिली.

याप्रकरणी मेरठचे एसएसपी अजय सहानी यांनी सांगितले, की रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मेडिकल प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले गेले आहेत. कुटुंबीयांनी काही तक्रार दिल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.