बसपाचा उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणूकीत ‘एकला चलो रे’चा नारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बहुजन समाज पार्टी (बसपा) ने आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 बाबत मोठा निर्णय घेतला आहे. पक्ष प्रमुख मायावती यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, बसपा आगामी निवडणूक स्वबळावर लढणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीसोबत मिळालेल्या यशानंतर दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढतील असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु हा अंदाज चुकीचा ठरला आहे. दरम्यान, मायावतींनी पक्ष बूथ स्तरावर मजबूत करण्याचे निर्देश दिले आहेत.

बसपाने लोकसभा निवडणुकीत 10 जागा मिळवल्या होत्या. या बैठकीत बसपाच्या संघटनात्मक रचनेत महत्त्वाचे बदल केले जाऊ शकतात. शनिवारी झालेल्या बैठकीत बसपाने यावर्षी बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये होणार्‍या निवडणुकासुद्धा लढण्याचा निर्णय घेतला आहे.

काय होती 2017 ची स्थिती !
पक्षात पडत असलेली फूट रोखणे हे यूपी निवडणुकीमधील मायावतींसमोर सर्वात मोठे आव्हान आहे. मागील काही महिन्यात बसपाच्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. बसपा नेते सपा किंवा भाजपाकडे जात असल्याचे दिसून आले आहे. याविषयावर देखील बैठकीत चर्चा होऊ शकते.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत बसपाने 403 जागांवर निवडणूक लढवली होती आणि 19 जागा जिंकल्या होत्या. बसपाच्या मतांमध्ये सुद्धा 3 टक्के घट दिसून आली होती. तर भाजपाने 312 जागा जिंकून आपला वनवास संपवला होता. समाजवादी पार्टीने काँग्रेससोबत आघाडी करून 298 जागांसाठी निवडणूक लढवली होती. सपाने 47 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने 105 जागा लढवून अवघ्या 7 जागांवर विजय मिळवला होता.