किती ब्राह्मणांकडे बंदुकांचा परवाना आहे ? योगी सरकारनं मागविली माहिती अन्…

पोलिसनामा ऑनलाईन – उत्तर प्रदेश सरकारने ब्राह्मण समाजाबाबत नुकताच एक अजब निर्णय घेतला आहे. त्यानंतर सरकारला तो मागेही घ्यावा लागला आहे. योगी सरकारच्या या निर्णयानुसार, राज्यातील किती ब्राह्मणांकडे बंदुकीचा परवाना आहे? याची मोजणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. राज्यातील ब्राह्मणांच्या हत्या, त्यांची असुरक्षितता आणि बंदुकीच्या मालकीच्या आकड्यांबाबत एका भाजपा आमदाराने विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता, यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता.

योगी सरकारने सर्व जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून बंदुक परवानासाठी अर्ज करणार्‍या आणि परवाना मिळवलेल्या ब्राह्मणांच्या संख्येबाबतचा तपशील मागवला होता. राज्याच्या गृहविभागाचे अप्पर सचिव प्रकाशचंद्र अग्रवाल यांची स्वाक्षरी असलेले हे पत्र 18 ऑगस्ट रोजी सर्व जिल्हाधिकार्‍यांना पाठवण्यात आले होते. यामध्ये 21 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यांकडून तपशील मागवण्यात आला होता. याबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर अग्रवाल यांनी टिपण्णी करण्यास नकार दिला. भाजपा आमदार देवमणी द्विवेदी यांनी 16 ऑगस्ट रोजी युपीच्या विधानसभेचे प्रधान सचिव प्रदीप दुबे यांना विधानसभेचे नियम आणि प्रक्रियांनुसार प्रश्न विचारत एक पत्र पाठवले होते. या पत्रात गृहमंत्री असलेल्या योगी आदित्यनाथ यांच्याकडून माहिती मागवण्यात आली होती की, गेल्या तीन वर्षांत राज्यात किती ब्राह्मण मारले गेले? त्यांचे किती मारेकरी पकडले गेले? तसेच यांपैकी कितींवर गुन्हे निश्चित झाले? ब्राह्मणांच्या सुरक्षेसाठी सरकारच्या योजना काय आहेत? प्राध्यान्यानुसार सरकार ब्राह्मणांना शस्त्र परवाने प्रदान करणार आहे का? किती ब्राह्मणांनी शस्त्र परवान्यांसाठी अर्ज केले आहेत? आणि यांपैकी किती परवाने प्रत्यक्ष वितरित करण्यात आले आहेत असा सवाल उपस्थित केला होता.