UP : परवान्याशिवाय मर्यादेपेक्षा जास्त दारू ठेवल्यास होणार कारवाई, 51000 ची द्यावी लागणार हमी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था: उत्तर प्रदेश सरकारने (up govt) नवीन उत्पादन शुल्क धोरण जाहीर केले आहे. याअंतर्गत तुम्हाला घरात निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त दारू ठेवायची असल्यास यूपी सरकारच्या (up govt ) उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना घ्यावा लागेल आणि तुम्हाला दरवर्षी सरकारला परवाना म्हणून 12 हजार रुपये द्यावे लागतील. एवढेच नव्हे तर सरकारला 51 हजार रुपये उत्पादन शुल्क विभागाला सुरक्षा म्हणून द्यावे लागतील. परवान्याशिवाय घरात निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात दारू ठेवल्यास कारवाई केली जाईल. तसेच होम लायसन्ससाठी तेच लोक पात्र असतील जे मागील पाच वर्षांपासून आयकर भरत आहेत. परवान्यासाठी अर्ज करताना आयकर विवरणपत्र भरल्याची पावतीही द्यावी लागेल. यासह अर्जदारांना त्यांच्या अर्जासह पॅनकार्ड आधारकार्डची प्रतही सादर करावी लागेल.

यासंदर्भात अर्जदारांना प्रतिज्ञापत्र देखील द्यावे लागेल, त्यानुसार कोणत्याही अनधिकृत किंवा 21 वर्षाखालील व्यक्तीला दारू ठेवलेल्या ठिकाणी प्रवेश करण्यास मनाई केली जाईल. तसेच उत्तर प्रदेशमधील वैध दारू व्यतिरिक्त कोणत्याही ठिकाणी अवैध किंवा अनधिकृत दारू किंवा इतर कोणतेही पदार्थ ठेवू नये. यूपी सरकारने जारी केलेल्या नव्या धोरणानुसार देशी व इंग्रजी दारू व्यतिरिक्त व बिअर व गांजाची किरकोळ दुकाने आणि मॉडेल दुकानांच्या परवान्यांचेही नूतनीकरण करण्यात येणार आहे. घरगुती व इंग्रजी दारूच्या किरकोळ दुकानांसह मॉडेल शॉपच्या परवान्याच्या फीमध्ये केवळ 7.5 टक्के वाढ केली आहे.