ट्रकला धडकल्यानंतर बसला लागली भीषण आग, 20 ठार तर 21 गंभीर जखमी

कन्नौज : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे जीटी रोड महामार्गावर एका डबल डेकर बसला ट्रकने दिलेल्या धडकेत बसला आग लागून त्यात २० जणांचा मृत्यु झाला. बसमधील २१ जण जखमी झाले आहेत. या अपघातात ट्रकलाही आग लागली होती.

कन्नौजमधील गुरसहायगंजमधून ही बस जयपूरला जात होती. ही बस फरुर्खाबादची असून त्या गुरुसहायगंजचे २६ आणि छिबरामऊचे १७ प्रवासी बसले होते. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता बसमधील सर्व प्रवासी झोपेत असताना ट्रकने या बसला जोरदार धडक दिली. थंडी असल्याने बसच्या सर्व खिडक्या आणि दारे बंद होत्या. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. बसच्या आतमध्येच त्यांचा आगीत होरपळून मृत्यु झाला. याबाबत पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी सांगितले की, बसमधील २५ प्रवाशांना वाचविण्यात यश आले आहे. त्यातील १२ जण तिरवा मेडिकल कॉलेज आणि ११ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दोघांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे.

या बसमधील १८ ते २० प्रवासी अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा मृत्यु झाला असण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बस पूर्णपणे भरलेली होती. बसला आग लागल्यानंतर एकच गोंधळ उडाला. सर्व जण एकाच वेळी बसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. १० ते १२ लोक उतरण्यात यशस्वी झाले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनाग्रस्त लोकांना सर्व प्रकारची मदत देण्याचे आदेश दिले आहेत. मृत्युच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/