‘तुझी औकात आहे का?, असं म्हणत नर्सनं डॉक्टरच्या श्रीमुखात लगावली’, रुग्णालयातील खडाजंगीचा व्हिडीओ व्हायरल (व्हिडीओ)

मुरादाबाद : वृत्तसंस्था – देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील पाच दिवसांपासून देशात तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. अनेक राज्यांमधली रुग्णालयांची क्षमता संपली असल्याने आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यामुळे रुग्णांचे हाल होत असून रुग्णाचे नातेवाईक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत असल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत आहेत. तर उत्तर प्रदेशातल्या रामपूरमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्येच खडाजंगी झाली आहे. नर्स आणि डॉक्टर यांच्यात वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ रामपूर जिल्हा रुग्णालयातील आहे. या ठिकाणी नर्स आणि डॉक्टरमध्ये वाद झाला. त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. हा वाद एवढा टोकाला गेला की नर्स आणि डॉक्टर यांच्यात हाणामारी झाली. नर्सने रागाच्या भरात डॉक्टरच्या कानशिलात लगावली. डॉक्टरने देखील नर्सला मारहाण केली. यामुळे एकच गोंधळ उडाला पोलीस आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दोघांची समजू काढून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रित झाला असून हा प्रकार सोमवारी (दि.26) रात्री साडे नऊच्या सुमारास घडला आहे.

जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. रुग्णाच्या नातेवाईंकांनी रुग्णालया प्रशासनाला मृत्यूचे प्रमाणपत्र मागितले. त्यासाठी नर्स डॉक्टराकंडे गेली. तर डॉक्टरांनी तिला ही बाब लिखित स्वरुपात आणायला सांगितली. नातेवाईक नर्सकडे गेल्यावर ती संतापली. तिनं आपत्कालीन विभागात धाव घेतली. यानंतर तिचा डॉक्टरसोबत वाद झाला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली आणि हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचले.

तुझी औकात आहे का, असं म्हणत नर्सनं डॉक्टरच्या कानशिलात लगावली. यानंतर डॉक्टरने देखील नर्सवर हात उचलला. यामुळे एकच गोंधळ उडाला. या ठिकाणी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाय मृत रुग्णाचे नातेवाईकदेखील तिथेच होते. यापैकी एकाने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला. त्यानंतर तो व्हायरल केला. दरम्यान हा प्रकार रुग्णालयातील पोलीस चौकीतील पोलिसांना समजला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना शांत केले. या प्रकरणात कोणीही तक्रार दिली नाही.