डबल मर्डरचा Live VIDEO : समाजवादी पक्षाच्या नेत्याचा आणि मुलाचा भरदिवसा गोळ्या झाडून खून

संभल (उत्तर प्रदेश) : वृत्तसंस्था – लॉकडाऊनमध्ये डबल मर्डरचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समाजवादी पक्षाचे नेते आणि त्यांच्या मुलाची गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे याचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. भर दिवसा सगळ्यांसमोर झालेल्या या डबल मर्डरमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

समाजवादी पक्षाचे नेते छोटा लाल दिवाकर आणि त्याचा मुलगा सकाळी शेतात फिरण्यासाठी गेले असता तिथे त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. मृत सपा नेते चंदौसी या विधानसभा मतदार संघातील समाजवादी पक्षाचे माजी उमेदवार होते. गावातीलच ग्रामस्थांवर त्यांच्या दुहेरी हत्येचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना बहजोई पोलीस ठाण्याच्या परिसरातील शमशोई गावात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावात नरेगा योजनेंतर्गत बनवल्या जाणाऱ्या रस्त्यावरून वाद झाला असल्याचे समोर आलं आहे. घटना घडल्यानंतर मारेकरी फरार झाल्याच सांगण्यात येत आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी पोलिसांची तीन पथकं रवाना केली आहेत. मृत छोटा लाला दिवाकर यांची पत्नी ग्रामप्रमुख आहे. नरेगा योजनेंतर्गत बनवल्या जाणाऱ्या रस्त्याला ते विरोध करत होते. त्यामुळे हा वाद झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

गावात भर दिवसा अशा प्रकारे दुहेरी खुनाची घटना घडल्यामुळे संपूर्ण गावात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर आरोपींचा तपास करण्याचे काम वेगाने सुरु करण्यात आले आहे.