‘मोदी-योगींच्या विरूध्द घोषणा देणार्‍यांना जिवंत पुरून टाकेन’

अलिगड : वृत्त संस्था – उत्तर प्रदेश सरकारमधील राज्यमंत्री रघुराज सिंह यांनी नागरिकत्व संशोधन कायद्याच्या (उअअ) समर्थनासाठी अलिगडमध्ये आयोजित रॅलीत वादग्रस्त विधान केले आहे. रविवारी अलीगडच्या नुमाईश मैदानात भाषण करताना ते म्हणाले, मोदी, योगींच्या विरूद्ध घोषणाबाजी करणार्‍यांना मी जिवंत गाडेन.

अलिगड मुस्लिम यूनिव्हर्सिटीमध्ये सीएए, एनआरसी आणि एनपीआरविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर त्यांनी निशाणा साधला. या आंदोलनात पीएम मोदी आणि उत्तर प्रदेशचे सीएम योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. आंदोलनात पीएम आणि सीएमच्या विरोधात मुर्दाबादच्या घोषणा दिल्या गेल्याने राज्यमंत्री रघुराज सिंह यांनी म्हटले की, मोदी-योगींच्या विरूद्ध घोषणा देणार्‍यांना मी जिंवत गाडेन.

उत्तर प्रदेशचे उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य रविवारी लोकांना संबोधित करण्यासाठी अलिगडच्या नुमाईश मैदानातील कोहिनूर व्यासपीठावर आले होते. त्यांच्या अगोदर राज्यमंत्री रघुराज सिंह हे सभेला संबोधित करत होते. यावेळी रघुराज सिंह म्हणाले, अलिगड मुस्लिम यूनिव्हर्सिटीमध्ये जे विद्यार्थी मोदी आणि योगींच्या विरूद्ध घोषणा देत आहेत त्यांना मी जिवंत गाडेन. यावेळी त्यांनी गांधी कुटुंबावरही जोरदार शाब्दिक हल्ला केला. राज्यमंत्री म्हणाले, नेहरूंना कोणती जात आहे का? त्यांचे खानदानच नव्हते.

रघुराज सिंह म्हणाले, हा देश हिंदू, मुसलमान, शिख, इसाई सर्वांचा आहे. पण अशा पद्धतीने मोदी आणि योगींच्या विरूद्ध वादग्रस्त घोषणा देऊ नये. रघुराज सिंह यांनी यापूर्वीही अनेकदा अशाप्रकारचे वादग्रस्त विधान केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/