UP : ‘लॉकडाऊन’ दरम्यान ‘सपा’च्या 2 नेत्यांची गोळया घालून हत्या, CM योगींनी दिले NSA लावण्याचे आदेश

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयाचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी पोलिस सज्ज असून आणि प्रत्येक येणाऱ्या- जाणाऱ्यांची चौकशी करून शोध घेण्यात येत आहे. पण दरम्यान, यूपीच्या गोंडा जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. परस्पर शत्रुत्वामुळे दोन सपा नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या गोळीबारात 6 जण जखमी झाले असून सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हस्तक्षेप करावा लागला. मुख्यमंत्र्यांनी हत्येत सामील असलेल्यांविरूद्ध एनएएस लावण्याचे निर्देश दिले आहेत. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, डीआर मनरेगा आणि एपीओ मनरेगा तरबगंज जॉबकार्ड धारकांचे निवेदन घेण्यासाठी परासपट्टी मझवारच्या संगमपुरवा प्राथमिक शाळेत गेले होते. यावेळी दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू झाला. ज्यात एक पक्षाने गोळीबार करण्यास सुरूवात केली. गोळीबारात सपा नेते देवेंद्र प्रताप सिंह उर्फ लाठीसिंग आणि गावातीलच कन्हैया पाठक यांचा जागीच मृत्यू झाला. या गोळीबारात विजय कुमारसिंग उर्फ चिंटू सिंग यांच्यासह तीन जण गंभीर जखमी झाले. घशाला गोळी लागल्याने चिंटू सिंग यांना लखनऊ ट्रॉमा सेंटर येथे हलविण्यात आले आहे. अन्य जखमींमध्ये अतुलसिंग, बृजमोहन यादव आणि आणखी एक जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दोषींवर एनएसए लावण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी व पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केली असून जखमींवर योग्य उपचारांची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या प्रकरणात सामील असलेल्यांविरूद्ध एनएसए लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. लॉकडाऊन दरम्यान घडलेल्या घटनेबाबत त्यांनी गोंडा जिल्हा दंडाधिकारी व पोलिस अधीक्षकांना इशारा दिला आहे.