‘सिंघम स्टाइल’चा व्हिडीओ बनवनं पडलं पोलिस अधिकार्‍यांना महागात, संपूर्ण टीमवर कारवाई (व्हिडीओ)

बस्ती (युपी) : वृत्तसंस्था – हातामध्ये अ‍ॅटोमॅटीक हत्यारं, डोळ्यावर काळा गॉगल, स्लो मोशन मध्ये चालणारा व्हिडिओ, हा कोणत्याही चित्रपटाचा सीन नाही. हा सीन आहे उत्तर प्रदेशातील बस्ती गुन्हे शाखेचे प्रभारी विक्रम सिंह आणि त्यांच्या पथकाचा आहे. आत्तापर्यंत गुन्हेगारांचे असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारल झालेले आपण पाहिले असतील. मात्र आता गुन्हे शाखेचा असा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

गुन्हे शाखेचे प्रभारी विक्रम सिंह आणि त्यांच्या पथकाने केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस निरीक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये पिस्तूल दिसत आहे. तसेच त्यांच्या स्लो मोशन व्हिडिओला एका पंजाबी गाण्याचे बॅकग्राऊंड म्युझिक देण्यात आले आहे. व्हिडिओ पाहताना असे दिसतेय की हा व्हिडिओ त्यांनी स्वतः तयार केला आहे. पोलिसांमध्ये एन्काऊंटर स्पेशलिस्ट होण्याची जणू स्पर्धाच लागली असल्याचे या व्हिडिओवरून दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये असे दर्शविण्याचा प्रयत्न केला गेला आहे की, काही वेळात गुन्हेगारासोबत चकमक होणार आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस महासंचालकांनी या पोलिसांना तात्काळ पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश दिले.

सामान्य नागरिक, गुन्हेगार किंवा स्वतः पोलिसांना देखील अशा प्रकारचे कृत्य करण्याची परवानगी नाही. त्यातच गुन्हे शाखेच्या प्रभारी विक्रम सिंह आणि त्यांच्या पथकाने अशा प्रकारे व्हिडिओ बनवल्याने त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या या अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का अशी चर्चा रंगू लागली आहे.

चार दिवसांपूर्वीच गुन्हे शाखचे प्रभारी विक्रम सिंह यांनी एका बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीचा एन्काऊंटर केला होता. त्यामुळे सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे ते चर्चेत आहेत. त्यांच्या व्हारल होत असलेल्या व्हिडिओ मोठ्या प्रमाणात लाईक करण्यात येत असून मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –