महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश सरकारला ‘उपरती’; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

लखनौ : कोरोना व्हायरस महामारीच्या काळात देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यादरम्यान अनेक निर्बंध लागू होते. पण अनेकांकडून नियमभंग करण्यात आले होते. अशा लोकांवर खटले दाखल झाले होते. महाराष्ट्र सरकारने हे खटले मागे घेण्याचे सांगितल्यानंतर आता उत्तर प्रदेश सरकारनेही याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

कोरोना संकट काळात संचारबंदीदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे महाराष्ट्र सरकार नियमानुसार न्यायिक प्रक्रियेचे पालन करून मागे घेणार, अशी घोषणा महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती. त्यानंतर आता उत्तर प्रदेश सरकारनेही हे गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली.

उत्तर प्रदेशचे कायदामंत्री ब्रजेश पाठक यांनी याबाबतचे आदेश आज (गुरुवार) दिले. तसेच कायदा मंत्रालयाने मुख्य सचिव यांनाही निर्देश दिले असून, कोरोना काळात राज्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती घेण्यास सांगितले.

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयाचा फायदा व्यापाऱ्यांसह इतर अनेकांना होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांना पोलिस ठाण्यात किंवा न्यायालयात जाण्याची गरज भासणार नाही.

महाराष्ट्र सरकारकडूनही यापूर्वी घोषणा

कोरोना काळात नियम मोडणाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा अनिल देशमुख यांनी यापूर्वीच केली होती. त्यानंतर आता उत्तर प्रदेश सरकारनेही याबाबतची घोषणा केली आहे.