काँग्रेसकडून सत्ता स्थापनेसाठी सोनिया गांधी मैदानात ! ‘हा’ आहे मास्टर प्लॅन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकांचा अजून एक टप्पा बाकी असला तरी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरु केले दिसून येत आहे. एकीकडे भाजप आपल्याला पूर्ण बहुमत मिळणार असून आपणच सत्ता स्थापन करणार असल्याचे सांगत आहे तर काँग्रेस आणि विरोधक आम्हीच बाजी मारणार असे सांगत आहे. त्यामुळे काँग्रेसने आता सर्व छोट्या प्रादेशिक पक्षांना बरोबर घेण्याचे प्रयत्न सुरु केल्याचे दिसून येत आहे. यासाठी राजधानी दिल्लीत राजकीय घडामोडींना मोठ्या प्रमाणात वेग आला आहे.

यासाठी माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सर्व मित्रपक्षांना या बैठकीचे आमंत्रण देण्यासाठी स्वतः पत्र लिहिले आहेत. त्याचप्रमाणे जे पक्ष ‘एनडीए’ आणि ‘यूपीए’ चा भाग नाहीत अशा सर्व पक्षांना त्यांनी या बैठकीसाठी आमंत्रित केले असल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीत १९ मे रोजी शेवटच्या टप्प्यासाठी मतदान पार पडत असून २३ तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. या बैठकीचे आयोजन देखील २३ तारखेलाच करण्यात आले आहे. सर्व प्रमुख पक्षांचे अध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान या बैठकीत सहभागी होण्यासाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना फोनकरून आमंत्रण दिल्याचे समजते. तसेच २३ तारखेला निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर तातडीने तोडगा काढण्यासाठी हि बैठक २३ तारखेला बोलावल्याचे समजते आहे.