आपल्या प्रभागात बेकायदेशीर होर्डींग लागणार नाहीत ही नगरसेवकांची नैतिक जबाबदारी : हायकोर्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तुमच्या प्रभागात जर कोणी बेकायदेशीर होर्डिंग लावत असेल तर नगरसेवक या नात्याने तुम्ही तक्रार केली पाहिजे. तुमच्या प्रभागात बेकायदेशीर होर्डिंग लागणार नाही याची व्यवस्था नगरसेवकांनी करावी. असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हंटले आहे.

भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल आणि केसरबेन मुरजी पटेल यांच्या जीवनज्योती फाऊंडेशनतर्फे अंधेरीतील पालिका मैदानाबाहेर आणि फूटपाथवर बेकायदा होर्डिंग-बॅनर लावल्याची तक्रार पालिकेच्या वेबसाईटमार्फत मिळाली होती. त्यानुसार, खातरजमा केल्यानंतर के वॉर्डातील लायसन्स इन्स्पेक्टर उत्तम सरवदे हे आपल्या सहकाऱ्यांसह कारवाईस गेले. पालिका अधिकारी हे होर्डिंग्ज काढत असताना पटेल यांचे समर्थक आणि भाजपचे कार्यकर्ते राजू सरोज, सुनील चिले, रोशन शेख, नरेश शेलार, महेश शिंदे, प्रकाश मुसळे, विशाल निचिते यांनी त्यांना प्रचंड शिवीगाळ करत पालिका कर्मचाऱ्यांना मारहाणही केली, असे महापालिकेने अवमान याचिकेद्वारे हायकोर्टाच्या निदर्शनास आणले. तसेच यासंदर्भातील फोटोही पुरावा म्हणून दाखल केले.

दरम्यान , एकही बेकायदेशीर होर्डिंग लावणार नाही, अशी हमी देणाऱ्या मुरजी पटेल यांनी त्यांच्या वॉर्डात एकही बेकायदेशीर होर्डिंग लागणार नाही याची व्यवस्था करावी. अनधिकृत होर्डिंग लागल्यास पटेल स्वत: त्याची तक्रार करणार का ? अशी विचारणा करताच त्यास भीतीपोटी नकार देणाऱ्या पटेलांना हायकोर्टाने सुनावले. इतकेच नव्हे तर, ‘तुमच्या वॉर्डात कुणीही बेकायदेशीर होर्डिंग लावल्यास नगरसेवक या नात्याने तुम्हीच तक्रार केली पाहिजे. त्यासाठी तुम्ही स्वत:ची यंत्रणा उभारली पाहिजे, नगसेवकच जर घाबरले तर सर्वसामान्यांनी काय करायचे ? असा प्रश्न न्यायालयाने विचारला . याचबरोबर यासंदर्भात आणि बेकायदेशीर होर्डींग काढण्यासाठी गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना केलेल्या मारहाणीची जबाबदारी घेणार की नाही ? यावर आठवड्याभरात उत्तर देण्याचे हायकोर्टाने बुधवारी जारी केले आहे.