धक्कादायक ! खबरींना फुटकी अंडी दिल्याने मंजूळा शेट्येला मारहाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दोन खबरींना फुटकी अंडी दिली म्हणून सर्व अधिकाऱ्यांनी भायखळा कारागृहातील वार्डन मंजुळा शेट्ये हिला मारहाण केली. आणि तिचा मृत्यू झाला असा धक्कादायक खुलासा मंगळवारी न्यायालयात झाला आहे. या खटल्यातील साक्षीदार महिला कैदीची साक्ष नोंदविण्यात आली.

२३ जून २०१७ च्या रात्री मंजूळा शेट्ये हिला केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जेल अधिक्षक मनिषा पोखरकर, महिला कारागृह पोलीस बिंदू नाईकवडे, वसिमान शेख, शितल शेवगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणे या ६ जणांवर मुंबई सत्र न्यायालयाने आरोप निश्चिती केली आहे. मंजुळा शेट्ये खून प्रकरणात आज ३३ वर्षीय़ महिला कैदी हर्षदा बेंद्रेची साक्ष नोंदविण्यास सुरुवात केली. तेव्हा तिने हा खळबळजनक खुलासा केला आहे.

मनिषा पोखरकर या कारागृह अधिक्षक म्हणून जानेवारी २०१७ मध्ये रुजू झाल्या होत्या. त्यांची कैद्यांमध्ये प्रचंड दहशत होती. त्या कधीही कुणाचीही विचारपुस न करता कैद्यांना शिवीगाळ करत होत्या. दरम्यान मंजूळाला मारहाण केल्यानंतर तिला कोणीही मदत केल्यास तिलाही अशीच मारहाण केली जाईल अशी धमकी पोखरकर यांनी बॅरेकमधील इतर कैदी महिलांना दिली होती. त्यामुळे मंजुळाला कोणीही मदत करण्यास धजावलं नाही. असं या साक्षीदार महिलेने सांगितलं.

दरम्यान कैद्यांसाठी काम करणाऱ्या समाजसेविकांनाही जेलमध्ये येण्यास पोखरकर यांच्या नियुक्तीनंतर मनाई केली होती. असे सांगण्यात आले. दरम्यान आजच्या सुनावणीला आरोपी हजर नसल्याने या साक्षी नोंदविण्यास विरोध केला आहे. सध्या उच्च न्यायालयाची नजर आहे त्यामुळे न्यायालयाने त्याला नकार दिला.