आता तरी जम्बो हॉस्पीटलचे दरवाजे लवकर उघडा, सातारकरांची अपेक्षा

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना जिल्ह्यात बेडची कमतरता भासत होती. तेव्हा जिल्हा प्रशासन जम्बो हॉस्पिटलच्या टेंडरची प्रक्रिया व साधनसामुग्री जमा करण्याचे काम करत होते. आता घाईत नऊ टेंडरची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जम्बो हॉस्पिटलचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून, चार ते पाच दिवसानंतर हे रुग्णालय सातारकरांच्या सेवेत उपलब्ध होईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, आता कोरोना रुग्णांची गरज संपल्यावर हॉस्पिटल सुरु करुन काय उपयोग, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला होता. तेव्हा रुग्णांना वेळेवर बेड उपलब्ध न झाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले. तर काहींना साधा ऑक्सिजन बेड सुद्धा उपलब्ध झाला नाही. तथापि, धाप लागून बहुतांश जणांचे बळी गेले. कोणत्याही रुग्णालयात दूरध्वनी संपर्क केला असता सर्व बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात येत होते. दुसरीकडे जिल्हा प्रशासन जम्बो हॉस्पिटल उभारणीत व्यस्त होते. त्यासाठी नऊ प्रकराची टेंडर काढण्यात आली. या प्रक्रियेला महिना उलटल्याने सप्टेंबरमध्ये रुग्णांचे प्रचंड हाल झाले.

तसेच जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे विविध रुग्णालयात बेड उपलब्ध होत असून, तेथे रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार परवडत नाही. म्हणून अशा रुग्णांसाठी जम्बो हॉस्पिटल मोठा आधार ठरु शकतो. आता तर खासगी रुग्णालयात बेड मिळत असल्याने जिल्हा रुग्णालयावरचा ताण कमी झाला आहे. यापूर्वीच वेळेत जम्बो हॉस्पिटलचा उपक्रम हातात घेतला असता तर सप्टेंबर महिन्यात रुग्णांचे हाल आणि मृत्यूचे प्रमाण रोखता आले असते.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता तेव्हा सरकार आणि प्रशासन जम्बो हॉस्पटिलची टेंडरप्रक्रिया काढण्यात गुंतले होते. आता तीन ते चार दिवसांत रुग्णालय सर्वांसाठी सेवेत दाखल होणार आहे. येथे पूर्णपणे मोफत उपचार करण्यात येतील. मात्र, आता उदघाटनाचा मुहूर्त पाहण्याऐवजी सर्वसामान्य नागरिकांना वेळेत उपचार मिळण्यासाठी तरी जम्बोचे दरवाजे उघडावीत, अशी आशा सर्वसामान्यातून व्यक्त करण्यात येत आहे.

जम्बो रुग्णालयातील बेड संख्या…
>> आयसीयू बेड – ५२

>> ऑक्सिजन बेड – २००

>> सर्वसाधारण बेड – ५०

>> एकूण बेड – ३००