रेकॉर्ड : जानेवारीमध्ये UPI मार्फत झाले 230 कोटीचे व्यवहार, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा होईल नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना काळात भारत सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) देशात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहेत. देशातील डिजिटल व्यवहार 2021 पर्यंत चारपटीने वाढण्याची अपेक्षा आहे. भारतात लोक डिजिटल व्यवहारासाठी यूपीआय (UPI) अर्थात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अमिताभ कांत म्हणाले की, जानेवारी 2021 मध्ये यूपीआयमार्फत 230 कोटी व्यवहार झाले आहेत. जानेवारी 2021 मध्ये यूपीआयमार्फत 4.3 लाख कोटी रुपयांचा व्यवहार झाला. जानेवारी 2020 च्या तुलनेत यूपीआय व्यवहारांच्या संख्येमध्ये 76.5% वाढ झाली आहे. दुसरीकडे, जर आपण व्यवहाराच्या मूल्याबद्दल बोललो तर मग व्यवहाराच्या रकमेत 100 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

यूपीआय म्हणजे काय?

यूपीआय अर्थात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस ही एक इंटर बँक फंड ट्रान्सफर सुविधा आहे, ज्याद्वारे स्मार्टफोनवरील फोन नंबर आणि व्हर्च्युअल आयडीच्या सहाय्याने पेमेंट केली जाऊ शकतात. हे इंटरनेट बँक फंड ट्रान्सफरच्या यंत्रणेवर आधारित आहे. एनपीसीआयद्वारे या सिस्टमला नियंत्रित केले जाते. वापरकर्ते काही मिनिटांतच यूपीआयमार्फत घरबसल्या पेमेंटसह मनी ट्रान्सफर करतात.

यूपीआय किती सुरक्षित आहे?

परंतु प्रश्न हा आहे की यूपीआय अखेर किती सुरक्षित आहे. डिजिटल व्यवहार ग्राहकांसाठी लाभदायक असून ते तितकेच धोकादायक देखील ठरू शकतात. देशात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ऑनलाईन फसवणूक वेगाने वाढत आहे. सामान्य लोकांची फसवणूक करण्यासाठी हॅकर्स रोज नवीन पद्धती वापरत असतात. दररोज सायबर क्राइमच्या घटना समोर येत असून यामध्ये लोकांच्या खात्यातून लाखों रुपये चोरले जात आहेत. म्हणूनच, आम्ही तुम्हाला सुरक्षित व्यवहारासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, ज्याद्वारे आपण फसवणूकीस बळी पडू शकणार नाहीत.

केवळ सुरक्षित अ‍ॅप्लिकेशनवरच करा यूपीआय पिनचा वापर

फसवणूक करणारे अ‍ॅप्लिकेशन आपल्या फोनद्वारे आपली खाजगी माहिती शोधू शकतात. त्यात देयसंबंधित माहिती देखील समाविष्ट आहे. आपण अशा अ‍ॅप्लिकेशन्स पासून दूर राहावे. आपला यूपीआय पिन सुरक्षित ठेवा कारण यामुळे फसवणूक होऊ शकते. खबरदारी म्हणून, यूपीआय पिन फक्त भीम यूपीआय सारख्या सुरक्षित अ‍ॅप्लिकेशनवरच वापरा. जर एखाद्या वेबसाइट किंवा फॉर्ममध्ये यूपीआय पिन टाकण्यासाठी लिंक देण्यात आली असेल तर त्या पासून सावध राहावे.

फक्त पैसे पाठविण्यासाठी टाका यूपीआय पिन

व्यवहार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपल्याला पैसे पाठवायचे असतील तेव्हाच आपल्याला यूपीआय पिन प्रविष्ट करण्यास सांगितले जाते. जर आपणास कुठून पैसे मिळत असतील आणि आपल्याला यूपीआय पिन विचारला जात असेल तर तेथे फसवणूक होऊ शकते हे लक्षात घ्या.

फक्त अशा पद्धतीने साधावा ग्राहक सेवेशी संपर्क

जर आपल्याला व्यवहारामध्ये कोणतीही समस्या येत असेल आणि आपल्याला ग्राहक सेवेशी संपर्क साधावा लागला असेल तर केवळ पेमेंट अ‍ॅप्लिकेशनचाच वापर करा. इंटरनेटवर दिल्या गेलेल्या अशा नंबरवर कॉल करू नका ज्याची पुष्टी झाली नसेल.

कोणालाही यूपीआय पिन सांगू नका

तुमचा यूपीआय पिन एटीएम पिन प्रमाणेच आहे. म्हणून हा कोणाबरोबरच शेअर करू नका. असे केल्याने फसवणूक करणारे त्याचा चुकीचा वापर करून आपली फसवणूक करू शकतात.