UP मध्ये ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात पहिली अटक; हिंदू मुलीसोबत पळाला होता मुस्लिम तरुण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    उत्तर प्रदेश सरकारने नुकताच लव्ह जिहाद विरोधात नवीन अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशांतर्गत तीन दिवसांपूर्वी बरेलीमध्ये पहिला एफआयआर नोंदवला असून, एकाला या प्रकरणी अटक केली आहे. हिंदू मुलीला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केल्याचा तसेच मुलीच्या पालकांनी धर्मांतरावर आक्षेप घेतल्यानंतर त्यांना धमकावल्याचा आरोप आरोपीवर करण्यात आला आहे.

ओवैस अहमद (वय 21) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे एका हिंदू मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. मागच्या वर्षी ते दोघेही पळून गेले होते. पण त्यावेळी आरोपीला अटक झाली होती. मुलीच्या वडिलांनी त्याच्यावर अपहरणाचा आरोप केला होता. पण मुलीने तो आरोप फेटाळून लावला होता. एप्रिल महिन्यात मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे दुसरीकडे लग्न लावून दिले. या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी रविवारी एफआयआर नोंदवला. ओवैस दबाव टाकून आपल्या मुलीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होता. तो आमच्या कुटुंबालासुद्धा धमकावत होता, असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला होता. मुलीचे लग्न झाल्याचे समजल्यापासून आरोपी ओवैस हा मुलीच्या कुटुंबीयांना त्रास देत आहे. मुलीला परत बोलवा. मुलीने धर्मांतर केल्यानंतर दोघांचे लग्न लावून देण्यासाठी कुटुंबीयांवर दबाव टाकत आहे, असे या प्रकरणात पोलीस अधिका-याने सांगितले. त्यानंतर शनिवारी तो मुलीच्या घरी गेला होता. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार नोंदवल्याने त्याच्यावर रविवारी एफआरआर नोंदवण्यात आल्याचे एसएचओ दया शंकर यांनी सांगितले. एफआयआर दाखल झाल्यानंतर तो फरार होता.

पोलीस त्याच्या मागावर होते. त्याच्यावर आयपीसीच्या कलम 504 आणि 506 आणि ‘विधि विरुद्ध धर्म संपरिवर्तन प्रतिषेध अध्यादेश 2020 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला होता. याबाबतचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे. लव्ह जिहाद विरोधी बनवलेल्या नव्या कायद्यांतर्गत 10 वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद केली आहे.