UPSC मध्ये ‘राहुल मोदी’ला मिळाली 420 वी रँक, सोशल मीडियावर ‘मिम्स’ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  संघ लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) २०१९ चा नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत फेब्रुवारी-ऑगस्टमध्ये झालेल्या मुलाखतीच्या आधारे यूपीएससीने मेरिट लिस्ट जाहीर केली आहे. परीक्षेत सोनीपतच्या प्रदीप सिंहचे नाव प्रथम क्रमांकावर आहे. तर जतीन किशोर दुसर्‍या आणि प्रतिभा वर्मा तिसर्‍या क्रमांकावर आहेत. निकालात जाहीर झालेल्या एकूण ८२९ उमेदवारांच्या यादीत राहुल मोदीचेही नाव आहे.

या यादीमध्ये टॉपरपेक्षा ४२० व्या क्रमांकावर आलेल्या राहुल मोदीची चर्चा जास्त आहे. लोक त्याचे नाव कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडून पहात आहेत. या उमेदवाराच्या नावाबाबत ट्विटरवर मिम्सने धुमाकूळ घातला आहे. लोक दोघांची यूपीएससी पास झाल्याबद्दल विनोद करत आहेत.

यामागील सत्य म्हणजे या वर्षीच्या निकालामध्ये ४२० व्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराचे नाव ‘राहुल मोदी’ आहे, ज्याचा रोल नंबर ६३१२९८० आहे.

यूपीएससीमध्ये प्रीलिम्स आणि मेन्स पास झाल्यावर तिसरा टप्पा मुलाखतीचा असतो. यावेळी कोरोनामुळे काही यूपीएससीच्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या होत्या. नंतर यूपीएससीने मुलाखतीत आलेल्या सर्व उमेदवारांना बर्‍याच सुविधा दिल्या होत्या.