खुशखबर ! आता यूपीएससीच्या मुलाखतीत नापास झालं तरीही नोकरी मिळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रशासकीय सेवेत रूजू होण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक परीक्षांपैकी एक म्हणजे यूपीएससीची परीक्षा. प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी अनेक तरुण प्रयत्न करत असतात. दिवस-रात्र मेहनत करुन उमेदवार पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पास होतात. मात्र काहींना मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत जाऊन अपयश येते. अशा मुलाखतीत अपयशी ठरलेल्या उमेदवारांसाठी यूपीएससी लवकरच नवी योजना आणणार आहे. मुलाखतीत जे विद्यार्थी यशस्वी होत नाहीत, त्यांचीही भरती करण्यात यावी, अशी शिफारस केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीने केंद्रीय मंत्रालये आणि विविध एजन्सीजना केली आहे. यूपीएससीचे चेअरमन अरविंद सक्सेना यांनी याबाबत माहिती दिली आहे.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, मुलाखतीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दुसरीकडे नोकरी दिली जाईल. यूपीएससीचा हा प्रस्ताव मान्य झाल्यास अवघ्या काही गुणांनी संधी हुकलेल्या मुलांसाठी नवी आशा निर्माण होईल.

अरविंद सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातल्या सर्वोच्च प्रशासकीय सेवेसाठी घेतल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत आता महत्वाचे बदल करण्यात येत आहेत. यूपीएससीची परीक्षा अत्यंत साधी आणि फ्रेंडली बनवण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. येत्या नागरी सेवेच्या पूर्व परीक्षेत परीक्षार्थींना अर्ज मागे घेण्याचाही पर्याय दिला जाणार आहे. शिवाय ऑनलाईन परीक्षा घेण्याचा प्रयत्नही यूपीएससीकडून केला जाणार आहे.

अरविंद सक्सेना म्हणाले की, ‘एक वर्षात जवळपास ११ लाख उमेदवार यूपीएससीच्या परीक्षेत सहभाग घेतात. नंतर पूर्व, मुख्य आणि मुलाखत झाल्यानंतर ६०० उमेदवारांची निवड होते. अनेक उमेदवार शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचतात, पण रँक येत नाही. सरकारकडून या मुलांबाबत विचार केला जाऊ शकतो. कारण, ते अगोदरच अत्यंत कठीण प्रक्रियेतून अंतिम टप्प्यापर्यंत आलेले असतात. हा प्रस्ताव मान्य झाल्यास परीक्षार्थींचा तणाव कमी करण्यास मदत होईल. शिवाय त्यांच्यात नोकरी करण्याची आशाही जीवंत राहिल.