Success Story : सुरूवातीला न्यायाधीश, नंतर IPS अधिकारी अन् आता कलेक्टर, यश मिळवण्यासाठी कठीण परिश्रम आणि कष्टाला पर्याय नाही

पोलीसनामा ऑनलाइन : आयुष्यात यश मिळवण्यासाठी कठीण परिश्रम आणि कष्टाला पर्याय नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतदेखील जो हार मानत नाही. त्याच्यापुढे यशाला झुकावेच लागते. आज आपण अशीच एक सक्सेस स्टोरी पाहणार असून, यामध्ये या व्यक्तीने कष्टाच्या जिवावर एक नाही तर तीन मोठ मोठी सरकारी पदे मिळवली आहेत. सध्याच्या जमान्यात सरकारी नोकरी मिळवणे हे स्वत: ऑलिम्पिक मेडल मिळवण्यासारखे झाले आहे. आणि त्यातही नागरी सेवेसारखी नोकरी मिळवणे हे एक मोठे यश आहे. या व्यक्तीने आपल्या स्वप्नांसाठी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कष्ट करत आपल्याला हवी ती पोस्ट शेवटी मिळवलीच. या अधिकाऱ्याचे नाव आहे सिद्धार्थ सिहाग.( Siddharth Sihag) हरियाणामधील ( Hariyana) हिसार जिल्ह्यातील सिवानी बोलानमध्ये सिद्धार्थचा जन्म झाला.

पंचकुलामध्ये त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. सिद्धार्थची पत्नी रुक्मिणी हीदेखील आयएएस आहे. जी डुंगरपूर जिल्हा परिषदेची सीईओ होती, आता बुंदीमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत आहे. सिद्धार्थचे वडील दिलबाग सिंह चीफ टाउन प्लानर म्हणून सेवानिवृत्त झाले, तर छोटा भाऊ दिल्ली कोर्टामध्ये न्यायाधीश आहे. आयपीएस होताना त्याने समाजाची सेवा करण्याचे एकच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले होते. यासाठी त्याने परिश्रम घेतले आणि सर्व प्रकारच्या परीक्षा दिल्या. आयएएस होण्यासाठी प्रवास करताना त्याला न्यायालयीन सेवेत जाण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांची नागरी सेवेत निवड झाली. पण रँकिंग कमी असल्याने त्यांना पोलीस सेवेत दाखल व्हावे लागले. सिद्धार्थला आयएएस व्हायचे होते. त्यामुळे त्याने ही नोकरी करत असतानाच परीक्षेची तयारीदेखील सुरु ठेवली.

आयुष्यात यश कसे मिळवायचे
जर तुम्ही एखाद्या लक्ष्यासाठी कठोर परिश्रम घेऊन परीक्षेची तयारी केली, तर तुमचे ध्येय नक्कीच साध्य होईल. तुम्ही ज्याचा विचार करता, ते यश तुम्हाला नक्की मिळतेच. कॉलेजमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रशासकीय अधिकारीच व्हायचं हे सिद्धार्थने ठरवले होते. त्यामुळे त्याने दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता केवळ यावरच लक्ष केंद्रित केले. सुरुवातीला त्याने दिल्ली न्यायिक सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सिद्धार्थची दिवाणी कोर्टात मेट्रोपोलियन दंडाधिकारी म्हणून निवड झाली होती. त्याचे ट्रेनिंग सुरू असतानाच आयएएसचा निकाल लागला आणि सिद्धार्थला १४८ वी रँक मिळाली. आयपीएससाठी निवड झाल्याने त्याला हैदराबादच्या राष्ट्रीय पोलीस ॲकॅडमीमध्ये ( Acadeamy) जावे लागले. पण आयएएस व्हायचे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते. त्यानंतरची यूपीएससीची परीक्षा पूर्ण तयारीनिशी दिली, त्या परीक्षेत सिद्धार्थने ४२ वी रँक मिळवली. यासाठी कोणतीही कोचिंग लावली नाही, फक्त नियमित अभ्यास हाच एक फंडा वापरला. दरम्यान, या तीनही परीक्षांसाठी कोणतेही कोचिंग क्लासेस लावले नसल्याचे सिद्धार्थने सांगितले. आयएएसच्या तयारीसाठी त्याने इंटरनेटचा आधार घेतला. ब्लॉग, इंटरव्ह्यूची खूप मोठी मदत झाली. जनरल नॉलेजवर पूर्ण फोकस असला पाहिजे. त्याचबरोबर सामान्य ज्ञानावर व्यक्तीची पकड हवी असल्याचेदेखील त्याने यावेळी सांगितले.