कौतुकास्पद ! UPSC ची तयारी करताना ‘या’ खास टिप्सचा वापर करून ‘ही’ IPS अधिकारी बनली IAS

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IAS आणि IPS या दोनही अखिल भारतीय सेवा आपल्याकडे अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. या पदांवर काम करण्यासाठी UPSC ची नागरी सेवा परीक्षा (CSE) पास होणे गरजेचे असते. आम्ही आज एका अशा अधिकाऱ्याची कहाणी सांगणार आहोत जिने ही परीक्षा २ वेळा उत्तीर्ण होऊन ही दोनही पदे मिळवली आहेत. मध्य प्रदेशच्या या महिला अधिकाऱ्याचे नाव गरिमा अग्रवाल असे आहे. जून २०१८ मध्ये प्रीलियम परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सप्टेंबर मध्ये मेन्सची परीक्षा आणि त्यानंतर यावर्षी २७ मार्च २०१९ रोजी आलेल्या निकालात गरिमाची आयएएस मुलाखतीसाठी निवड झाली, त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर तिने ४० वा क्रमांक मिळविला. यापूर्वी २०१७ मध्येही ती CSE पास होऊन २४१ व्या रँकसह आयपीएस अधिकारी म्हणून निवडली गेली होती. जाणून घेऊयात दोनदा ही जगातील २ऱ्या क्रमांकाची अवघड असणारी परीक्षा पास झालेल्या गरिमा अग्रवाल यांच्या तयारीविषयी.

एका मुलाखतीत गरिमा अग्रवाल म्हणाली की सर्वत्र यूपीएससीमध्ये लोकांची निवड केली जाते. बरेच लोक अतिशय कठीण परिस्थितीत आपले ध्येय्य गाठतात. मीसुद्धा दिल्लीत राहून तयारी केली. येथे आल्यानंतर, खूप काही शिकले आणि माझ्या मतानुसार, तयारीच्या काही टिप्स आहेत. या आम्ही खाली देत आहोत.

कमीतकमी स्त्रोत, अधिक रिव्हिजन 
आपण तयारीला सुरुवात केलीत तर लोक हजारो पुस्तके वाचायला सांगतील. मात्र पाहायला गेल्यास अशा प्रचंड पुस्तकांच्या ढिगाऱ्याबरोबर तुम्ही तयारी करू शकत नाही. माझा तुम्हाला सल्ला आहे की मोजकीच पुस्तके वाचा आणि त्यांच्याच नोट्स काढून पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा. अशा पद्धतीने तयारी करणे सोपे जाईल.

विचलित करणार्‍या गोष्टींपासून दूर रहा 
तयारीच्या वेळी मी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅपदेखील एका वर्षासाठी पूर्णपणे बंद केले होते. तयारीच्या वेळी कमीत कमी घरगुती समारंभांना हजेरी लावा आणि अभ्यासाला प्राधान्य द्या. जर आपण एका वर्षासाठी अशा प्रकारे परिश्रमपूर्वक तयारी केली तरच आपल्याला एक चांगला रिझल्ट मिळू शकेल.

सपोर्ट सिस्टिम
हनुमान पर्वत उचलणार होता तेव्हा जामवंताने त्याला शक्तीची आठवण करून दिली. तुमच्या आयुष्यात असे लोक असावेत जे तुम्हाला प्रेरणा देतील. अशा लोकांपासून दूर रहा जे आपल्याला नकारात्मक करतात. आपल्या सपोर्ट सिस्टिम मधील लोकांना किमान अर्धा तास द्या.

ग्रुप डिस्कशन महत्त्वाचे
स्पेक्ट्रम, राजकारण आणि भूगोल या विषयांचा अभ्यास मी गटात एकत्रितपणे केला. मी माझ्या दोन मित्रांशी अभ्यासाविषयी खूप चर्चा करायचे. आम्ही एकाच प्रश्नावर वेगवेगळी उत्तरे लिहायचो. याशिवाय सेल्फ स्टडी हादेखील सर्वोत्तम पर्याय आहे.

स्मार्ट स्टडी गरजेचा
लोक म्हणतात की कठोर परिश्रम करा, तुम्हाला फळ मिळेल. परंतु वास्तविकता अशी आहे की योग्य दिशेने कठोर परिश्रम केले पाहिजेत, परंतु अभ्यासात सातत्य असले पाहिजे. माझ्या बाबतीतही, मी अभ्यासात हा मंत्र स्वीकारला की जे आयुष्यात काहीही झाले तरी तयारी सोडू नका. आपल्या यशाबद्दल ती म्हणते, माझ्या यशात माझे परिश्रम आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद यांचा वाटा आहे.