सर्फ एक्सेलची जाहिरात का ठरतेय वादग्रस्त ? #BoycottSurfExcel हॅशटॅग होतोय ट्रेंड 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ‘दाग अच्छे है’ अशी टॅग लाईन असणाऱ्या यापूर्वीच्या अनेक सर्फ  एक्सेल म्हणजेच कपडे धुण्याच्या पावडरच्या जाहिराती खूप प्रसिद्ध झाल्या, चर्चेत आल्या पण नव्या सर्फच्या जाहिरातिला टीकेला सामोरे जावे  लागत आहे. करणं होळी स्पेशलच्या या जाहिरातीमध्ये हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे सोशल नेट्वर्किंग साईटस वर #BoycottSurfExcel  करीत सर्फच्या उत्पादनावर बहिष्कार घातला आहे. हा टॅग आता ट्रेंड होताना दिसत आहे. काही जणांनी या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे तर काहीच जण या जाहिरातीचे कौतुक करीत आहेत.

काय आहे सर्फ एक्सेल ची वादग्रस्त जाहिरात ?
सर्फ एक्सेलनं रंग लाए संग कँपेनद्वारे हिंदू-मुस्लिम एकोप्याचाच संदेश दिलाय. एक मिनिटाच्या या जाहिरातीत शुभ्र पांढऱ्या टी शर्टमध्ये एक हिंदू मुलगी एका गल्लीत सायकलवरून जातेय. घराच्या गॅलेरीत उभी असलेली बच्चेकंपनी तिच्या अंगावर रंग टाकून सगळे रंग संपवते.

रंग संपल्यानंतर ती आपल्या मुस्लिम मित्राच्या घरी जाते. बाहेरून त्याला हाक मारते आणि म्हणते बाहेर ये, सर्व संपलंय. तो छोटा मुलगा पांढऱ्या कुर्ता-पायजमा आणि नमाजची टोपी घालून बाहेर येतो. त्याला सायकलच्या मागे बसवून ती त्याला मशिदीच्या दरवाजाकडे सोडते. जिने चढता चढता तो मागे वळून म्हणतो, येतो मी. नंतर ती म्हणते, रंग उडवतील तुझ्यावर. त्यावर तो मंद स्मित देतो. जाहिरातीच्या शेवटी सांगितलं जातं, ‘अपनेपन के रंग से औरों को रंगने में दाग लग जाएं तो दाग अच्छे हैं.’ दाग अच्छे है ही सर्फ एक्सेलची टॅग लाईनच आहे. या जाहिरातीतून सामाजिक संदेश दिला जातोय.

सर्फची धुलाई करा : रामदेव बाबा
स्वदेशीचा नारा देणारे रामदेव बाबा यांनी देखील या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे. बाबा रामदेव यांनी ट्विट करीत ‘सर्फ एक्सेल’ला धुवून टाका’ अशा आशयाचे ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की ” आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मात्र सध्या जे सुरु आहे त्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. असं वाटतयं की ज्या परदेशी ‘सर्फ’ने आपण कपड्यांची धुलाई करायचो आता त्याच ‘सर्फ’ची धुलाई करण्याचे दिवस आले आहेत,’’ असं रामदेव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.