Pune News : भंडाऱ्यातील दुर्घटनेनंतर पुण्यातील आरोग्य यंत्रणांना आली जाग, दिले ‘हे’ आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भंडारा जिल्हा (Bhandara) सामान्य रुग्णालयात (Bhandara District General Hospital) आग लागल्यामुळे 10 नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भंडारा येथील दुर्घेटनेनंतर पुण्यातील आरोग्य यंत्रणेला खडबडून जाग आली आहे. आरोग्य विभागाने आपल्या सर्व शिशू केअर युनिटचे इलेक्ट्रिकल ऑडिट तातडीन करुन घेण्याचे आदेश दिले आहेत.

पुण्यातील औंध येथील जिल्हा आणि ससून रुग्णालय या ठिकाणी नवजात अर्भकांवर उपचार करण्याची सुविधा आहे. ससून रुग्णालयात 59 तर जिल्हा रुग्णालयात 24 खाटांचे लहान मुलांसाठी अतिदभता विभाग आहेत. भाडारा जिल्ह्यात घडलेल्या दुर्घटनेनंतर दोन्ही संस्था प्रमुखांनी तातडीने इलेक्ट्रिकल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. ससून रुग्णालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या अंतर्गत येते. तर जिल्हा रुग्णालय सार्वजनिक आरोग्य विभागाचा भाग आहे. या दोन्ही खात्यांनी आपापल्या कक्षेतील रुग्णालयांना अतिदक्षता विभागाची सद्यस्थिती तपासून त्यामध्ये तातडीने सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या संदर्भात सार्वजनिक आरोग्य खात्याचे पुणे परिमंडळचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले की, पुणे परिमंडळामध्ये पुणे, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. या तीनही जिल्ह्यामध्ये अतीदक्षता विभाग आहे. पुण्यात 24 तर कराड, सातारा, पंढरपूर या ठिकाणी प्रत्येकी 12 खाटांचे युनिट आहे. या ठिकाणच्या फायर ऑडिट करुन घेण्याचे आदेश दिले आहेत.

बी.जे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी सांगितले, ससून रुग्णालयात 59 खाटांचा नवजात अतीदक्षता विभाग आहे. अद्यावत आणि वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असलेल्या विभाचे नियमित फायर ऑडिट केले जाते. तसेच याठिकाणी स्प्रिंकलची देखील सुविधा उपलब्ध आहे. यामुळे आगीच्या दुर्घनेत स्प्रिंकलर सुरु होत असल्याने पुढील धोका टाळतो.