आता ‘या’ महिला खेळाडूचा बायोपिक येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक चित्रपटाचे वारे वाहत आहे. गेल्या काही वर्षात अनेक बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आणि येत्या काळात अजूनही काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आतापर्यंत राजकारणी, कलाकार, खेळाडू यांच्या जीवनावर चित्रपट येऊन गेले आहे. मेरी कॉम नंतर आता आणखी एका खेळाडूच्या जीवनावर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सूत्रानुसार असे कळले आहे की प्रसिद्ध टेनिस खेळाडू सानिया मिर्जा हिच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच बनणार आहे.

या बायोपिकचे सर्व हक्क सानिया मिर्जाने एका नवीन प्रोडक्शन कंपनीला विकले असल्याचे कळले आहे. ही कंपनी आहे निर्माता रॉनी स्क्रूवाला यांची आरएसवीपी.

नुकतेच या कंपनीने ‘उरी-द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाची निर्मिती केली असून या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. हक्क विकत घेतल्यानंतर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी काही अभिनेत्रींना विचारण्यात आल्याचे वृत्तही समोर आले आहे परंतु अद्याप कोणाचेही नाव फायनल झाले नाही.

हा चित्रपट इतर भाषेतही रिलीज करण्याचा निर्णय आरएसवीपी कंपनीने घेतला आहे. या चित्रपटात तिच्या खेळाव्यतिरिक्त खाजगी आयुष्यही दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटांशिवाय आणखी काही महिलाप्रधान चित्रपटाची निर्मिती होणार असून त्याचे शुटिंगही चालू आहे. सध्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘मणिकर्णिका’ प्रदर्शनाच्या मार्गावर असून लक्ष्मी अग्रवाल हिच्या जीवनावर आधारित ‘छपाक’ चित्रपटाचे काम चालू आहे. तसेच महिला पायलट गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचे शूटिंग चालू असून हे सर्व चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.