Coronavirus : आता तुमच्या लघवीतूनच होणार गंभीर कोरोनाचे निदान

वॉशिंग्टन : वृत्त संस्था – संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग पाहिला मिळत आहे. विविध देशांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत आहे तर काही देशांत ही संख्या वाढताना दिसत आहे. सध्या कोरोनाची अनेक लक्षणे समोर आली आहेत. पण जर तुम्हाला गंभीर कोरोना आहे का? हे तुमच्या लघवीतून निदान होणार असल्याचे संशोधनातून दिसत आहे.

कोरोनाची विविध लक्षणे समोर येत आहेत. काही कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सौम्य, काही जणांमध्ये मध्यम तर काहींमध्ये तीव्र लक्षणे दिसत आहेत. इतकेच नाहीतर काही रुग्णांमध्ये लक्षणेच दिसत नाहीत. पण तरीही त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहे. कोरोना रुग्णांमधील लक्षणांनुसार त्यांच्यावर उपचार केले जात आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या मूत्राचे नमुने आजाराच्या तीव्रतेचा अंदाज घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात आणि यातून रोगाची तीव्रता समजू शकते, असे संशोधकांनी म्हटले आहे.

अमेरिकेतील डेट्रॉईटमधील वेन स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अभ्यासात संसर्ग नसलेल्या व्यक्तींच्या तुलनेत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारकशक्तीच्या विशिष्ट बायोमार्कर्सची पातळी वाढल्याचे दिसून आले आहे. या व्यतिरिक्त उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या कोमॉर्बिड रुग्णांमध्ये या इन्फ्लेमेटरीचे प्रमाण अधिक होते.

…तर गंभीर आजाराची माहिती मिळेल

आम्हाला आशा आहे की कोविड-19 च्या रुग्णांसाठी नियमित चाचणी प्रक्रियेत या तपासणीचा समावेश झाला तर आजार किती गंभीर पातळीवर जाईल याचा अंदाज बांधून संभाव्य उपचारांची रणनीती आखता येईल. अमेरिकन फिजिओलॉजीकल सोसायटीच्या प्रायोगिक जीवशास्त्र 2021 या वार्षिक बैठकीत हे निष्कर्ष सादर केले जातील, असे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.