‘उरी’च्या धसक्याने तीन चित्रपटांनी रिलीज डेट बदलल्या 

मुंबई :  वृत्तसंस्था – उरी येथील हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगला गल्ला जमवला आहे. हा सिनेमा २०१९ मधील पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. सिनेमाने जगभरामध्ये २०० कोटींहून अधिकची कमाई केली आहे.

११ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘उरी’ चित्रपटाची प्रसिद्धी कायम असून चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘उरी’ चित्रपटाची लोकप्रियता व चढता आलेख पाहता आगामी ‘सोनचिड़िया’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. त्याचप्रमाणे आणखी दोन चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १५ मार्च रोजी एक चित्रपट प्रदर्शित होणार होता.

हिंदीत चांगले यश मिळवल्यानंतर उरी हा चित्रपट दक्षिणेकडील तमिळ, तेलगू आणि मल्याळम या भाषामध्ये रिमेक केला जाणार आहे.  जम्मू काश्मीरच्या ‘उरी’ येथे झालेल्या पाकिस्तानच्या हल्ल्यात १९ भारतीय सैनिकांना वीरमरण आले होते. भारताने यावेळी सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. याच हल्ल्यावर आधारित हा ‘उरी’ चित्रपट आहे. यात विकी कौशल याने प्रमुख भूमिका केली आहे. विकीसह यात मोहीत रैना, परेश रावल, यामी गौतम आणि किर्ती कुल्हारी यांचीही प्रमुख भूमिका आहे. चौथ्या आठवड्याच्या शेवटपर्यंत सिनेमा २५० कोटींहून अधिकचा गल्ला जमवेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.