उर्मिला मातोंडकरांचा CM च्या आवाहनाला प्रतिसाद, शिवसेनेच्या शिबिरात केले रक्तदान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिध्द अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सक्रियरित्या पक्षाच्या कामाला सुरुवात केली आहे. शिवसेनेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सहभाग घेत मातोंडकर यांनी रविवारी (दि. 6) मुंबईतील कूपर रुग्णालयात रक्तदान केले आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबईतील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्याने मुंबईकरांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर मुंबईत ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यात मातोंडकर यांनी पुढाकार घेत अंधेरी येथील शिवसैनिक संजय कदम यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात उपस्थिती लावली. याबाबतचे एक ट्विटकरुन उर्मिला यांनी माहिती दिली आहे.

डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी शिवसेनेच्या पुढाकारातून अंधेरी पश्चिम येथे आयोजित रक्तदान शिबिरात योगदान देता आले याबाबत मी स्वत:ला भाग्यवान समजते. रक्ताच्या तुटवड्यामुळे कोविड काळात अशा शिबिराचे आयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे आभार असे ट्विट उर्मिला मातोंडकर यांनी केले आहे.