लग्नानंतर मी धर्म बदलला नाही ; नवरा मुस्लिम आणि मी हिंदू – उर्मिला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस पक्षाची ईशान्य मुंबईची उमेदवार उर्मिला मातोंडकर हिच्या धर्मावरुन सध्या ती ट्रोल होत आहे. उर्मिलाने लग्नानंतर तिचा धर्म बदलल्याची टीका नेटकऱ्यांनी केली होती. अभिनेत्री पायल रोहतगीने तर उर्मिला धर्मपरिवर्तन केले असून तिचे नाव मरियम अख्तर मीर असल्याचा दावा केला होता. या सर्व चर्चांना आज उर्मिलाने उत्तर दिले आहे. लग्नानंतर आपण धर्म बदलला नसल्याचे तिने सांगितले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने आपण धर्म बदलला नसल्याचे सांगितले आहे. ‘मी माझा धर्म बदलेला नाही. माझा नवरा मुस्लीम आहे, पण तरी देखील मी धर्म बदलेला नाही. मी हिंदू असल्याचा मला अभिमान आहे. धर्मनिरपेक्षता हे आपल्या देशाचे सौंदर्य़ आहे. ज्यामुळे प्रत्येकाला आपापल्या धर्माचे आचरण करण्याचा अधिकार आहे. ट्रोलर्स इस्लामला एक विशिष्ट रंगात रंगविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी लोक फक्त समाजात द्वेष पसरवू शकतात, असे उर्मिला मातोंडकरने म्हटले आहे’.

दोन दिवसांपूर्वी उर्मलावर अभिनेत्री पायल रोहतगी हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार हल्लाबोल केला होता. उर्मिलाने लग्नानंतर धर्म परिवर्तन केले असून आता ती उर्मिला मातोंडकर नसून मरियम अक्तर मीर असल्याचा दावा रोहतगीने केला होता.