उर्मिला मातोंडकरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, पण.. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी जवळपास वर्षभर आधी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर मंगळवारी (दि. 1) त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावर राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले, अनेक राजकीय पक्षांमध्ये बॉलिवूडमधील किंवा मराठी सिनेमातील कलाकार प्रवेश करतात. उर्मिला यांनी शिवसेनेत प्रवेश केला ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांचे मी सक्रीय राजकारणात स्वागत करतो. त्यांनी आधी काँग्रेससोबत काम केेले आहे. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली पण तरीही जर त्या राजकारणात येऊन शिवसेनेच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करण्यास तयार असतील, तर त्यांचे स्वागत आणि त्यांना शुभेच्छा, असे ते म्हणाले.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधत नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. त्याआधी उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

महाराष्ट्रासाठी त्या चांगले काम करतीलः आदित्य ठाकरे
दरम्यान, उर्मिला यांच्या पक्षप्रवेशावर राज्याचे युवा मंत्री आदित्य ठाकरे यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. उर्मिला मातोंडकर यांचे सर्वच शिवसैनिक स्वागत करत आहेत. महाराष्ट्रात विविध लोकोपयोगी कार्यात त्यांचा सहभाग असेल याची खात्री आहे. आपल्या राज्यासाठी त्या नक्कीच चांगले काम करतील. पक्षप्रवेशाच्या वेळी आमची भेट झाली. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचा खरोखरच आनंद आहे. त्यांना चांगलं काम करण्यासाठी शुभेच्छा!”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.