ऊर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत ‘सस्पेन्स’ कायम

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत त्या शिवबंधन बांधणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. तत्पूर्वी त्या पत्रकार परिषद घेणार असून त्यावेळी त्या पुढील राजकीय वाटचाल कशी आणि कोणत्या राजकीय पक्षातून असेल या संदर्भात निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल अजूनही सस्पेन्स कायम आहे.

लोकसभा निवडणूक पराभवानंतर उर्मिला यांचे नाव शिवसेनेने राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत समावेश केले आहे. त्यामुळे राज्यपालांची मंजुरी मिळताच त्या विधान परिषदेत शिवसेनेच्या आमदार म्हणून आपली राजकिय कारकीर्द सुरू करणार आहेत. त्यापर्वी त्यांना शिवसेना पक्षात अधिकृत पक्ष प्रवेश करावा लागणार आहे.

मात्र या पक्ष प्रवेशाबाबत घगोंधळ निर्माण झाला आहे. एका मराठी दैनिकाने ऊर्मिला यांनी आपण शिवसेनेत पक्षप्रवेश करणार नाही असे म्हंटल्याचे वृत्त प्रसारित केले आहे. तर सेनेचे नेते संजय राऊत आणि अनिल परब यांनीही ‘कदाचित’ शब्दावर जोर देऊन ऊर्मिला सेनेत प्रवेश करतील, असं म्हटलं आहे. त्यामुळे ऊर्मिला काय भूमिका घेता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिवसेनेची महिला आघाडी अधिक बळकट होणार
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ऊर्मिला मातोंडकर शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. मातोंडकर यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेची महिला आघाडी अधिक बळकट होणार आहे.