उर्मिला मातोंडकर उद्या सेनेत प्रवेश करणार ! CM ठाकरे यांच्या उपस्थितीत बांधणार शिवबंधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिध्द सिनेअभिनेत्री उर्मिला मातोंडकर (actress Urmila Matondkar) या पुन्हा एकदा सक्रीय राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. उर्मिला मातोंडकर ह्या सोमवारी (दि. 30) शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief and Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत त्या हाती शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा आहे.

यापूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून निवडणूकही लढवली होती. त्यावेळी गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला होता. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांचा विषय चर्चेत आल्यानंतर मातोंडकरांचे नाव चर्चेत आले होते. राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी शिवसेनेने त्यांच्या नावाची शिफारस केल्याने मातोंडकर यांनी हा प्रस्ताव स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांच्या पदांसाठी 12 जणांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली आहे. यामध्ये शिवसेनेने उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे-पाटील, विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी यांना संधी दिली आहे. तर काँग्रेसने रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन आणि अनिरुद्ध वणकर यांना संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रसने एकनाथ खडसे, राजू शेट्टी, आनंद शिंदे, आणि य़शपाल भिंगे यांना संधी दिली आहे.

You might also like