Pune : ताथवडे उद्यानात आढळला खापरखवल्या साप

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – पावसाळ्यामध्ये जमिनीखालील अनेक जीवजंतू, साप बाहेर पडत असतात. सध्या अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शहरात कधी न आढळणारा दुर्मिळ असा खापरखवल्या साप कर्वेनगर येथील शाहिद मेजर प्रताप ताथवडे उद्यानात नितीन कंधारे यांना आढळला. धामणीपेक्षा अत्यंत संथ गतीने या सापाची हालचाल असून कंधारे यांनी प्राणीमित्र प्रणिती खर्डेकर यांच्या मदतीने खापरखवल्या सापाला निसर्गाच्या सानिध्यात सोडले.

प्रणिती खर्डेकर म्हणाल्या, खापरखवल्या सापाला युरोपेल्टीस असे शास्त्रीय नाव आहे. हा साप बिनविषारी असून पावसाळ्यात आढळतो. शहराच्या मध्यवर्ती भागात आढळल्याने निश्‍चितच ही दुर्मिळ गोष्ट आहे. या काळात साप बाहेर पडणे स्वाभाविक असून नागरिकांनी घाबरून न जाता नजीकच्या सर्पमित्राला बोलवावे.

खापरखवल्या सापाचे वैशिष्ट्य
भारतात आढळणारी बिनविषारी सापाची प्रजाती.
सामान्यतः जमिनीखाली राहतो.
गांडुळ, मुंग्या, कीटकांना खातो.
पश्‍चिम घाटात जास्त आढळतो.
जमीन भुसभुशीत ठेवणे, मुंग्यांसह जमिनीतील इतर कीटकांची संख्या मर्यादित ठेवणे,
नायट्रोजनचे स्थिरिकरणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.