26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य आरोपी तहव्वुर हुसेनला अमेरिकेत अटक

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पाकिस्तानी दहशतवादी  तहव्वुर हुसेन राणाला अमेरिकन प्राधिकरणाने अटक केली आहे. तहव्वुर हुसेन हा 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात वॉन्टेड होता. अमेरिकन प्राधिकरणाने त्याला लॉस एंजेल्समधून अटक केली. हुसेनची दोन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या तुरुंगातून सुटका करण्यात आली होती, परंतु प्राधिकरणाने त्याला पुन्हा अटक केली आहे. तहव्वुर हुसेन हा पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडलीचा सहयोगी होता आणि 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या कटात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.  दरम्यान,  भारत अमेरिकेकडे  सतत त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी करीत आहे.

माहितीनुसार, तहव्वुरने एक याचिका दाखल केली होती, ज्यात त्याने कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे म्हटले होते. यानंतर त्याला तुरूंगातून सोडण्यात आले. परंतु हुसेनवर भारतीय एजन्सीचे पूर्ण लक्ष होते, हे लक्षात घेता आता अमेरिकेच्या एजन्सीने त्याला भारताने लादल्या गेलेल्या आरोपावरून पुन्हा अटक केली आहे.  तहव्वुर हुसेन राणाला 10 जून 2011 रोजी जूरीने दोषी ठरवले होते. त्याने डेन्मार्कच्या वृत्तपत्रावर हल्ला करण्याचा कट रचल्यामुळे आणि लष्कर-ए-तैयबाला मदत केल्याबद्दल त्याला दोषी ठरविण्यात आले. राणा गेली दहा वर्षे अमेरिकेच्या तुरूंगात आहे. त्याने दहशतवादी गटांना मदत केली असा आरोप आहे.

 तहव्वुर राणा मुंबई हल्ल्याचा मुख्य आरोपी 

दरम्यान, मुंबई दहशतवादी हल्ल्यात 160 हून अधिक लोकांचा बळी गेला. त्यामध्ये अनेक परदेशी नागरिकांचा समावेश होता. हा दहशतवादी हल्ला लष्कर-ए-तैयबाच्या 10 दहशतवाद्यांनी केला होता. सुरक्षा पथकांनी नऊ दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर एक दहशतवादी अजमल कसाब पकडला गेला. 21 नोव्हेंबर 2012 रोजी कसाबला पुण्याच्या येरवडा जेलमध्ये फाशी देण्यात आली. तपासादरम्यान राणा मुंबईत आल्यानंतर ताज हॉटेलमध्येच राहिला आणि येथून त्याने संपूर्ण आराखडाही तयार केला होता. यानंतर नोव्हेंबर  2008  मध्ये मुंबईत हल्ले झाले आणि ताज हॉटेल हे दहशतवाद्यांचे मुख्य लक्ष्य होते.