अमेरिकेमध्ये Tesla ला दणका, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इलेक्ट्रीक वाहननिर्मिती क्षेत्रातील अमेरिकेतील आघाडीच्या टेस्ला कंपनीचे प्रमुख Elon Musk यांनी भारतात बेंगळुरु येथे टेस्लाचा (Tesla) प्रकल्प उभारणार असल्याचे जाहीर करताच देशभरातून त्याचे स्वागत झाले. इकडे भारतात टेस्लाचे स्वागत होताना दुसरीकडे त्यांच्यात देशात म्हणजे अमेरिकेत कंपनीला मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेतील नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी एडमिनिस्ट्रेशनने (NHTSA) बुधवारी टेस्ला इंकला 1,58,000 कार परत घेण्यास सांगितले आहे या यादीत टेस्लाचे S आणि X मॉडेलचा समावेश आहे. दरम्यान, या गाड्यांमधील टचस्क्रीन डिस्प्ले काम करत नसल्यामुळे सुरक्षिततेला धोका वाढत आहे.

एका ऑटो सुरक्षा एजन्सीने नोव्हेंबरमध्ये सुरक्षा तपासणी केल्यानंतर टेस्लाला 2012 ते 2018 या काळात बाजारात आलेली एस आणि 2016 ते 2018 या काळात तयार झालेल्या एक्स मॉडेलच्या गाड्या तात्पुरत्या काळासाठी बंद करण्याची विनंती केली होती. कारण या गाड्यांमध्ये मोटार वाहन सुरक्षा नियमावलीसंबंधी अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. टेस्लाने यावर काही उत्तर दिले नव्हते. परंतु, कंपनीला 27 जानेवारीपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे. जर टेस्ला गाड्या परत बोलावण्यास सहमत झाले तर त्यांना एनएटीएसएला कळवावे लागेल. टचस्क्रीनमधील त्रुटीमुळे सुरक्षेसंबंधित प्रश्न निर्माण होत आहेत. यामध्ये रिअर व्ह्यू/बॅकअप कॅमेरा इमेजचे नुकसान होत आहे.

एनएचटीएसएने म्हटले की, टेस्ला आपल्या वाहनांमधील काही समस्येवर काम करण्यास प्रयत्न करत आहेत. काही अपडेटही करण्यात आले आहेत. परंतु, हे अपडेट पुरेसे नसल्याचे एनएचटीएसएने म्हटले आहे. कंपनीला यावर काम करावे लागेल. त्यासाठी गाड्या रिकॉल करणे आवश्यक आहे.