US : बायडेन प्रशासनात सोनिया अग्रवाल यांची सल्लागारपदी नियुक्ती, अनेक भारतीयांना मानाचं ‘पान’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ऊर्जा आणि हवामान बदलांच्या वरिष्ठ सल्लागापदी भारतीय वंशाच्या सोनिया अग्रवाल यांची नियुक्ती केली आहे .अग्रवाल यांच्याव्यतिरिक्त बायडेन यांनी अनेक भारतीय वंशाच्या नागरिकांना संधी दिली आहे. यापूर्वीही अग्रवाल यांनी बायडेन उपराष्ट्राध्यक्ष असताना ऊर्जा विषयांत त्यांच्यासोबत मोलाची भूमिका बजावली होती.

नुकत्याच अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत जो बायडेन यांनी विजय मिळवला. 20 जनेवारी रोजी बायडेन राष्ट्राध्यक्षपदाची तर कमला हॅरिस या उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान बायडेन यांनी प्रशासनात अनेक भारतीय वंशाच्या लोकांची नियुक्ती केली आहे. अग्रवाल या भारतीय वंशाच्या असून त्यांचा जन्म ओहियोमध्ये झाला. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून आपले इंजिनिअरिंगच शिक्षण पूर्ण केले आहे. बायडेन यांच्या प्रशासनात स्थान मिळालेल्या भारतीय वंशाच्या लोकांमध्ये कमला हॅरिस यांचेही नाव आहे.

याव्यतिरिक्त निरा टंडन या कॅबिनेट रँकसह व्यवस्थापन आणि अर्थसंकल्प कार्यालयाच्या संचालक म्हणून काम पाहणार आहेत. विवेक मूर्ती सर्जन जनरल, वेदांत पटेल सहाय्यक माध्यम सचिव, विनय रेड्डी भाषण लेखन संचालक आणि गौतम राघवन हे राष्ट्रपती कार्यालयाचे उपसंचालक म्हणून कार्यरत असणार आहेत. तसेच अतुल गवांडे, सेलीन गौंडर हे कोविड19 टास्क फोर्स सदस्य, भरत राममूर्ती राष्ट्रीय आर्थिक परिषदेचे उपसंचालक, सबरिना सिंह यांच्याकडे कमला हॅरिस यांच्या उप माध्यम सचिव पदाची जबाबदारी दिली आहे. तर माला बाया अदिगा यांच्याकडे जिल बायडेन यांच्या धोरण संचालक पदाची, शपथविधी सोहळ्याच्या आयोजन समितीच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी माजू वर्गिस यांना दिली आहे. दुसरीकडे तरूण छाब्रा, सुमोना गुहा यांनादेखील ट्रम्प प्रशासनात महत्त्वाच स्थान दिले आहे.