अमेरिकेत वाहनाने 2 पोलीस अधिकाऱ्यांना चिरडले ! एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी; घटनेनंतर कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर

पोलीसनामा ऑनलाइन : अमेरिकेतील कॅपिटॉलमध्ये वाहनाने धडक दिल्याने एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून 1 जण जखमी झाला आहे. हा एक कथित हल्ला मानला जात आहे. दरम्यान या हल्ल्यात पोलिसांनी हल्लेखोराला गोळ्या घालूून ठार केले आहे. या हल्ल्याचं नेमक कारण समजू शकले नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी घटनेवर शोक व्यक्त केला आहे. हा हल्ला दहशतवादाशी संबंधित असल्याचे प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही, मात्र आम्ही नक्कीच तपास करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. AFP ने दिलेल्या वृत्तानुसार या घटनेनंतर कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.

वाहनातून आलेल्या या 25 वर्षीय हल्लेखोराची ओळख पटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वॉशिंग्टन कॉम्प्लेक्स येथे वाहनाने सुरक्षेसाठी लावलेल्या बॅरिअरला धडक दिली आणि आतमध्ये घुसले. यावेळी 2 पोलीस अधिकारी जखमी झाले होते. यात एकाचा मृत्यू झाला. हल्लेखोराने वाहनातून बाहेर येत पोलिसांवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी गोळ्या घालून त्याला ठार केल्याचे पोलीस प्रमुखांनी सांगितले. हल्लेखोराने मार्च महिन्यात ऑनलाइन केलेल्या काही पोस्टमध्ये निराशा आणि विकृती जाणवत आहे. आपण बेरोजगार असून आरोग्याच्या समस्या असल्याचाही उल्लेख त्याने आपल्या पोस्टमध्ये केला आहे. याशिवाय सरकार वर्णद्वेषी असल्याचे सांगत सरकार पहिल्या क्रमांकाचा शत्रू असल्याचे म्हटले आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.