Coronavirus : चीनच्या वुहानमधील लॅबमध्ये प्रशिक्षणार्थीच्या चुकीमुळं लिक झाला ‘कोरोना’, अमेरिकी चॅनलचा दावा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चीन पासून जगभर पसरलेला कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरतच आहे. ब्रिटन, रशिया आणि अमेरिकेसह जगातील अनेक देशांनी चीनवर जगभरात कोरोना विषाणू पसरविल्याचा आरोप केला आहे. या सर्व प्रकारात, अमेरिकच्या एका वृत्तवाहिनीने असा दावा केला आहे की कोरोना विषाणू चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे कार्यरत असलेल्या एका इंटर्नकडून चुकून लीक झाला आहे. वृत्तवाहिनीच्या या दाव्यानंतर आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.

वृत्तवाहिनीने सादर केलेल्या अहवालात असे सांगितले गेले आहे की सूत्रांच्या मते भलेही जगाला वाटत असेल की कोरोना विषाणू हा नैसर्गिक आहे, पण मुळात तसे नाही. वुहानच्या व्हायरोलॉजी प्रयोगशाळेपासून त्याची उत्पत्ती झाली. संशोधनादरम्यान, सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे हा विषाणू लीक झाला आणि स्वतः इंटर्नला देखील त्याची लागण झाली. यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या तिच्या प्रियकराला देखील कोरोनाची लागण झाली आणि नंतर हा विषाणू जलद गतीने प्राण्यांच्या बाजारपेठेत पोहोचला.

वृत्तवाहिनीकडून असा दावा केला जात आहे की कोरोना विषाणूबद्दल बोलल्या जात असलेल्या वेट मार्केटमध्ये वटवाघूळांची कधीच विक्री करण्यात आलेली नाही. वृत्तवाहिनीच्या म्हणण्यानुसार, चीन हे लपवत आहे की विषाणू लॅबमधून लीक झाला आहे आणि वेट मार्केटला मुद्दाम दोषी ठरवत आहे. अहवालानुसार वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही जगातील प्रमुख पी -4 लेव्हल प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत, जगभरातील धोकादायक विषाणूंची चाचणी घेतली जाते.

दोन वर्षांपूर्वीच अमेरिकी दूतावासाने दिली होती माहिती

अमेरिकेच्या एका वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार अमेरिकन दूतावासाने वुहानच्या व्हायोलॉजी लॅबमध्ये सुरक्षेची पुरेशी व्यवस्था नसल्याची माहिती चीनी अधिकाऱ्यांना दिली होती. दोन वर्षांपूर्वी त्याचा धोका लक्षात घेऊन त्यांनी कठोर पावले उचलण्यास सांगितले होते. अगदी गृहखात्यानेही प्रयोगशाळेत पुरेसे प्रशिक्षित तंत्रज्ञ नसल्याचा इशारा दिला होता. असे असूनही चीन सरकारने याकडे लक्ष दिले नाही.