US : पुन्हा मुस्लिमबंदीविरोधी विधेयक, तब्बल 140 खासदारांचा पाठिंबा

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – डेमोक्रेटिक पक्षाच्या 140 खासदारांनी मुस्लिमांना भविष्यात अमेरिकेत येण्यास घातली जाणारी संभाव्य बंदी आणि धर्माच्या आधारे केला जाणारा भेदभाव रोखण्यासाठी शुक्रवारी संसदेत पुन्हा विधेयक सादर करण्यात आले. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिमांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती.

माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण, सीरीया, लिबिया, येमेन, उत्तर कोरिया, सोमालिया आणि व्हेनेझुएला सारख्या मुस्लिम देशांना लक्ष्य करत, त्यांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी केली होती. मात्र, नवनियुक्त अध्यक्ष जो बायडेन यांनी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी ही बंदी उठवली होती.

या पार्श्वभूमीवर न्याय समितीचे अध्यक्ष जेरोल्ड नॅडलर आणि जुडी चू यांनी प्रतिनिधीगृहात, तर सिनेटर ख्रिस कून्स यांनी संसदेत नॅशनल ओरिजिन बेस्ड अँटि डिस्क्रिमिनेशन फॉर नॉन इमिग्रंट (नो बॅन) ॲक्ट हे विधेयक पुन्हा सादर केले. खासदार ॲमी बेरा, रो खन्ना, प्रमिला जयपाल आणि राजा कृष्णमूर्ती यांनीही या विदेयकाला पाठिंबा दिला आहे.

माजी अध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनाने इतर देशांमधील नागरिकांविरोधात पूर्वग्रह दर्शवणारी मुस्लिमबंदी जाहीर केली. त्याचवेळी ती घटनाबाह्य, भेदभावजनक आणि नैतिकदृष्ट्या निंदनीय असल्याचे स्पष्ट झाले होते. बायडन यांनी पहिल्याच दिवशी धाडसी निर्णय घेत ट्रम्प प्रशासनाने घातलेली बंदी रद्द केली. याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. मात्र भविष्यात कोणत्याही राष्ट्रध्यक्षांनी हे धोरण पुन्हा अंमलात आणू नये, यासाठी हे विधेयक मांडण्यात आल्याचे नॅडलर यांनी सांगितले.