Coronavirus : कहर ! अमेरिकेत 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू, वुहानमध्ये 1 नवा ‘कोरोना’ग्रस्त आढळला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे चीनमधून जगभरात कोरोना पसरल्यानंतर आता चीनमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या अटोक्यात येत आहे तर दुसरीकडे भारत, अमेरिका, इराण, इटली या देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जगभरात या व्हायरसमुळे जवळपास 2 लाख पेक्षा जास्त लोकांना संक्रमित केले आहे तर 7900 लोकांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेत कोरोनाच्या संक्रमणाने मृत झालेल्यांची संख्या 105 वर पोहोचली आहे आणि अमेरिकेतील सर्व 50 राज्यात कोरोना पसरला आहे. ऑस्ट्रेलियात देखील या व्हायरसमुळे 450 लोकांना संक्रमण झाले तर कोरोनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या वुहान शहरात मंगळवारी फक्त 1 रुग्ण आढळला. असे असले तरी आणखी 11 लोकांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या 3,237 वर पोहोचली आहे. भारताच्या विविध भागात 10 नवी प्रकरणं समोर आली आहेत. तर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 147 झाली आहे.

कोरोनाने चांगलाच कहर केला आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर आणि नागरिकांवर होत आहे. त्याचसाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मोठ्या पॅकेजची घोषणा केली आहे. एका महिन्यात कोरोनाग्रस्त मृतकांची संख्या अमेरिकेत 100 वर गेली आहे. तर 6500 कोरोनाग्रस्त आढळले आहेत.

अमेरिकेत 10 पेक्षा जास्त लोकांना एकत्र न येण्याची विनंती केली गेली आहे. त्यांनी लोकांना जास्तीत जास्त काळ घरात राहण्याचे आणि जमेल तितके काम घरुन करण्यास सांगितले आहे. देशभरातील शाळा, कार्यालये, बार, रेस्टॉरेंट आणि अनेक दुकाने बंद करण्यात आली आहेत. चीनमध्ये वुहान आणि हुबेई प्रांत 23 जानेवारीपासून बंद आहेत. उद्योग आणि व्यवसायांवर त्याचा परिणाम होत आहे. फ्रान्स, मॉरेशिअस, आयरलँड, डेनमार्क या देशात देखील भीतीचे वातावरण आहे. सर्व देशातील प्रशासन खबरदारीच्या उपाय योजना राबवत आहेत.