मोदी-शाह यांच्याविरोधातील 760 कोटींच्या याचिकेसंदर्भात US न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अमेरिकेतील (US) एका न्यायालयाने (Court) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली 10 कोटी डॉलर म्हणजेच 760 कोटी 47 लाख रुपयांची याचिका फेटाळून लावली आहे. फुटीरतावादी काश्मीर-खलिस्तानी गट आणि दोन व्यक्तींनी ही याचिका दाखल केली होती. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार याचिकाकर्ते या प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयाने दिलेल्या तारखांना हजर राहू शकले नाहीत. त्यामुळेच न्यायालयाने ही याचिका रद्द केली आहे. टेक्सासमधील ह्युस्टन येथे 19 सप्टेंबर 2019 रोजी आयोजित करण्यात आलेल्या हाऊदी मोदी कार्यक्रमानंतर ही याचिका दाखल करण्यात आली होती.

भारताने जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेण्यासंदर्भात संसदेमध्ये घेतलेल्या निर्णयाविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल कंवल जीत सिंह ढिल्लाँ यांच्याकडून नुकसान भरपाई म्हणून 10 कोटी डॉलर्सची मागणी केली होती. ढल्लाँ हे सध्याचे डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीचे महानिर्देशक आणि संरक्षण प्रमुखांसाठी (चीफ ऑफ डिफेन्स) इंटीग्रेटेड डिफेन्स स्टाफचे उपप्रमुख आहेत.

अमेरिकेतील टेक्सासमधील दक्षिण टेक्सास जिल्हा न्यायालयामधील न्यायाधीश फ्रान्सेस एच.स्टेसी यांनी सहा ऑक्टोबर रोजी दिलेल्या निर्देशांमध्ये काश्मीर खलिस्तान रेफरण्डम फ्रंटला या याचिकेची सुनावणी पुढे केली जावी यासंदर्भात काहीच केलेलं नाही. सुनावणीसाठी देण्यात आलेल्या दोन तारखांनाही याचिकाकर्ते उपस्थित राहिले नाहित असं सांगत याचिका रद्द केली.

काश्मीर खलिस्तान रेफरण्डम फ्रंट यांच्यासोबत असलेल्या इतर दोन याचिकाकर्ते कोण होते हे स्पष्ट होऊ शकले नाही. त्या दोन्ही याचिकाकर्त्यांची नावं टीएफके आणि एसएमएस अशी देण्यात आली होती. अर्ज करणाऱ्यांची बाजू मांडण्याची जबाबदारी फुटीरतामतवादी वकील गुरपतवंत सिंग यांनी स्विकारली होती.