‘ओसामा बिन लादेन’ला जेव्हा ठार केले तेव्हा ‘या’ कारणामुळे पाकिस्तानला दिली नाही माहिती, खळबळजनक खुलासा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे की, त्यांनी एबटाबादमध्ये ओसामा बिन लादेनच्या ठिकाणांवर छापा मारण्याच्या माहिमेत पाकिस्तानला सहभागी करण्यास नकार दिला होता, कारण हे ‘उघड सत्य’ होते की, पाकिस्तानचे लष्कर, विशेषकरून त्यांच्या गुप्तचर यंत्रणेतील काही तत्वांशी तालिबान आणि शक्यतेनुसार अलकायदाशी संबंध होते आणि ते अनेकदा अफगाणिस्तान आणि भारताच्याविरूद्ध सामरिक भांडवल म्हणून त्यांचा वापर करत होते.

ओबामा यांच्या पुस्तकात खुलासा
ओबामा यांनी ‘ए प्रॉमिस्ड लँड’ नावाच्या आपल्या पुस्तकात राष्ट्राध्यक्ष म्हणून आपल्या कार्यकाळात एबटाबादमध्ये मारण्यात आलेल्या छाप्याची माहिती दिली आहे. अमेरिकी कमांडोंच्या या छाप्यात जगातील मोस्ट वाँटेड दहशतवादी लादेनला 2 मे, 2011 ला ठार केले होते. त्यांनी सांगितले की, या अत्याधुनिक गुप्त अभियानाला तत्कालिन संरक्षण मंत्री रॉबर्ट गेट्स आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष आणि सध्याचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी विरोध केला होता.

ओसामाला ठार करण्याच्या अनेक पर्यायांवर झाला विचार
अमेरिकेच्या पहिल्या कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, एबटाबादमध्ये पाकिस्तानी सैन्य छावणीच्या बाहेर एका आश्रयस्थानात लादेन राहात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अलकायदा प्रमुखाला मारण्यासाठी अनेक पर्यायावर विचार करण्यात आला. त्यांनी म्हटले की, या मोहिमेची गोपनीयता राखण्याच्या आवश्यकतेने आव्हान वाढवले होते. ओबामा म्हणाले, आम्हाला माहित होते की, जर कुणाला बिन लादेनबाबत आमच्या पावलाचा थोडा जरी सुगावा लागला, तरी संधी आमच्या हातातून निघून जाईल, यासाठी संपूर्ण संघ सरकारमध्ये केवळ काही लोकांनाच मोहिमेच्या योजनेची माहिती देण्यात आली होती.

त्यांनी लिहिले आहे, आमच्या समोर आणखी एक अडथळा होता. आम्ही कोणताही पर्याय निवडला असता, तरी त्यामध्ये पाकिस्तानला सहभागी करता येणार नव्हते.

ओबामा यांनी म्हटले, मात्र पाकिस्तान सरकारने दहशतवाद विरोधी अनेक अभियानांमध्ये आम्हाला सहकार्य केले आणि अफगाणिस्तानमध्ये आमच्या दलांसाठी महत्वाच्या पुरवठ्याचा मार्ग खुला केला, परंतु हे उघड सत्य होते की पाकिस्तानचे लष्कर, विशेषता त्यांच्या गुप्तचर सेवांमध्ये काही तत्वांचे तालिबान आणि शक्यतेनुसार अलकायदाशी सुद्धा संबंध होते. ते हे कधीकधी त्यांचा सामरिक भांडवल म्हणून वापर करत असत. अफगाण सरकार कमजोर राहावे आणि पाकिस्तानचा सर्वात मोठा शत्रू भारताला अफगाणिस्तानच्या जवळ येऊ न देणे, यासाठी हा वापर केला जात होता.

पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेशन करण्यात होती अडचण
त्यांनी लिहिले आहे की, पाकिस्तानचे लष्कर एबटाबाद परिसरापासून काही किलोमीटरच्या अंतरावर होते, ज्यामुळे या गोष्टीची शक्यता वाढली होती की, पाकिस्तान्यांना काहीही सांगितले तरी अभियानाची माहिती लीक होऊ शकली असती. त्यांनी एबटाबादमध्ये जरी कोणताही पर्याय निवडला असता, त्यांना सर्वात धोकादायक पद्धतीने आपल्या सहकार्‍याच्या क्षेत्रात विना परवानगी घुसावे लागले असतेच आणि राजकीय संबंध सुद्धा डावावर लागले होते. यातील गुंतागुंतसुद्धा वाढली होती.

शेवटी दोन पर्यायांवर झाला विचार
अखेरच्या टप्प्यात दोन पर्यांयावर विचार करण्यात आला की, हवाई हल्ला करावा किंवा एखाद्या विशेष मिशनला अधिकृत करण्यात यावे, ज्या अंतर्गत एक टीम हेलीकॉप्टरने गुपचुप पाकिस्तानात जाईल, परिसरात छापा मारेल आणि पाकिस्तानी पोलीस किंवा लष्कर प्रतिक्रिया देण्यापूर्वी तेथून बाहेर पडेल.

ओबामा आणि त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा टीमने दुसरा पर्याय निवडला. ओबामा यांनी म्हटले की, या अभियानानंतर त्यांनी स्थानिक आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक लोकांशी फोनवर चर्चा केली, ज्यामध्ये त्यांना सर्वात अवघड पाकिस्तानचे तत्कालिन राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्याशी बोलायचे होते, ज्यांना पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे हनन झाल्याने टीकेला तोंड द्यावे लागणार होते. त्यांनी म्हटले, मात्र, मी जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली, तेव्हा त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.