‘या’ कारणाने वडिलांनी मुलाकडे २९ लाखांचा शैक्षणिक खर्च परत मागितला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एका वडिलांनी चक्क आपल्या मुलाकडे त्याच्यावर केलेला शैक्षणिक खर्च मागितल्याचा प्रकार मुंबईमध्ये घडला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या मुलाला कोर्टातही खेचलं. विशेष म्हणजे मुलानेही खर्चाची  रक्कम तीन टप्प्यात देण्याची तयारी दर्शवली आहे. वडिलांचा आईशी काडीमोड झाला, त्यावेळी  मुलगा त्याच्या आईच्या पाठीशी उभा राहिला. त्यातून हा प्रकार घडल्याचं मुलाच्या वकिलांचं म्हणणं आहे.
वडिलांनी मुलाला शिकून अमेरिकेत पाठवले. मात्र अचानक वडिलांनी शिक्षणासाठी आलेला २९  लाखांचा खर्च परत मागितला. त्यासाठी मुलाला कोर्टात खेचलं. त्याविरोधात मुलाने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली.
वडिलांचा आईशी काडिमोड झाला, यावेळी मुलगा आईच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. यावरुन हा प्रकार घडल्याचं मुलाच्या वकीलांनी सांगितलं आहे. मुलाने आपल्या याचिकेत वडिलांना १५ लाख रुपये तीन टप्प्यात देण्याची तयारी दर्शवली आहे.
बापलेकात शैक्षणिक खर्च परत मागण्यावरुन कोर्टात खटले येत असतील, तर ते समाजातील मूल्ये ढासळत असल्याचं लक्षण आहे, असं मत  मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भाटकर यांनी व्यक्त केलं.
न्यायमूर्ती मृदुला भाटकर म्हणाल्या की, ‘वडिलांनी आपल्या मुलासोबतचं नाते नाकारणं अतिशय दुर्दैवी आहे. वडिलांनी मुलांना शिक्षण देणं, त्यांच्या शिक्षणावर आपल्या कुवतीप्रमाणे खर्च करणं हे पालक म्हणून त्याचं कर्तव्यच आहे. यामध्ये आर्थिक व्यवहाराचा प्रश्नच येत नाही, हा सारा खोडसाळपणा आहे’. पालकांनी आपल्या शिक्षणावर असा खर्च केल्याबद्धल मुलांनी कृतज्ञ असलं पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं.